#MeToo चे वादळ काही शमेना....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:26 PM2018-10-18T21:26:32+5:302018-10-18T21:29:07+5:30
#MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू काही #MeToo ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
हिंदी चित्रपटसृष्टी गेल्या काही दिवसांपासून #MeToo च्या आरोपांमुळे हादरून गेली आहे. दरदिवशी चित्रपटसृष्टीतील कुणी ना कुणी #MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू काही #MeToo ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. #MeToo अंतर्गत लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर आलोकनाथ यांनी कायद्याचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विनता नंदा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आलोकनाथ यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे नंदा यांच्या या पोस्टवर बंधनं घालण्याची मागणी आलोकनाथ यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र सुनावणीदरम्यान आलोकनाथ यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळत नंदा यांना सोशल मीडियावर आरोप पोस्ट करण्याची मुभा दिली आहे. शिवाय सुनावणीला गैरहजर राहिल्याने आलोकनाथ यांना न्यायालयाने फटकारले आहे. याप्रकरणी ते मुख्य व्यक्ती असल्याचं सांगत पुढल्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
महिला पत्रकार, सहाय्यक दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.
#MeToo अंतर्गत दिग्दर्शक साजिद खान याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. महिला पत्रकार, सहाय्यक दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. तसंच दिया मिर्झा आणि बिपाशा बासू यांनीही साजिदची महिलांशी वागणूक कशी आहे हे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर साजिदचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. विशीत असताना मुलींना, महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे आणि बरेच अफेअर्स होते अशी कबुली साजिदने या व्हिडीओत दिली आहे. बडा कमीना आदमी था अशी स्वतःची संभावना त्याने या व्हिडीओत केली आहे. तिशीत दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत केल्यावर कामामुळे मुलींकडे आकर्षित झालो नसल्याची सारवासारव करण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे.
फँटम फिल्म्स कंपनीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने बहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.
#MeToo वादळातील आणखी एक नाव म्हणजे क्वीन फेम दिग्दर्शक विकास बहेल. फँटम फिल्म्स कंपनीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने बहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर बहल यांनी फँटम फिल्म्स कंपनीतील त्यांचे पार्टनर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने या दोघांवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अनुराग आणि विक्रमादित्य हे दोघंही आपली प्रतिमा मलीन करत असून त्यांच्या वक्तव्यावर बंदी आणण्याची मागणीही बहेल यांनी केली आहे.
गायक-संगीतकार अनु मलिक यांच्यावर गायिका श्वेता पंडितने ट्विट करून आरोप केले आहेत.
#MeToo अंतर्गत आरोप झालेल्यांच्या यादीत कैलाश खेरनंतर संगीत विश्वातील आणखी एकाचं नाव जोडसे गेले आहे. गायक-संगीतकार अनु मलिक यांच्यावर गायिका श्वेता पंडितने ट्विट करून आरोप केले आहेत. काम देण्याच्या बदल्यात अनु मलिकने आपल्याकडे कशाप्रकारे किसची मागणी केली होती ही आपबिती श्वेताने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे. अनु मलिक तुमची आता वेळ संपली आहे असं म्हणत तिने त्यांना थेट इशाराही दिला आहे.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा एक महिलांची समिती गठीत करणार आहे.
#MeToo अंतर्गत हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसागणिक लैगिक अत्याचार आणि शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा एक महिलांची समिती गठीत करणार आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.
डायेंड्रा सोरेसने सुहेल यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
#MeToo अंतर्गत लेखक आणि सेलिब्रिटी कन्सल्टंट सुहेल सेठ यांच्यावरही अनेक महिलांनी लैगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलांमध्ये आता बिग बॉस-8ची स्पर्धक डायेंड्रा सोरेस हिचाही समावेश झाला असून तिने सुहेल यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. दिल्लीतल्या एका पार्टीत सुहेल यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप डायेंड्रान केला आहे. शिवाय सुहेल यांनी बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या जीभेचा चावा घेतल्याचं डायेंड्राने म्हटले आहे.