राखी सावंत वादग्रस्त चुंबन प्रकरणी मिका सिंहला दिलासा, गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 06:18 AM2023-06-16T06:18:27+5:302023-06-16T06:18:43+5:30
विनयभंगप्रकरणी दाखल करण्यात आला होता गुन्हा
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राखी सावंत विवादित चुंबनप्रकरणी गायक मिका सिंह याला उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. विनयभंगप्रकरणी दाखल केलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला.
दोघांनी त्यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविल्याचा दावा मिकाने केल्याने आणि त्या दाव्याच्या समर्थनार्थ राखी सावंतने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. डिगे यांनी मिका सिंहवरील गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला. ११ जून २००६ रोजी मुंबई उपनगरातील एका रेस्टॉरंटमध्ये बर्थडे पार्टीदरम्यान सिंहने राखी सावंतचे बळजबरीने चुंबन घेतल्याने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अटकपूर्व जामिनासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज केला आणि १७ जून २००६ रोजी त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.
दोघांमधील वाद मिटल्याने मिकाने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राखी सावंतने गुन्हा रद्द करण्यास हरकत न घेतल्याने गुन्हा रद्द करावा, अशी विनंती मिकाच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती.