मिलिंद गुणाजींनी दिला होता बिग बींसोबत काम करण्यास नकार? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:25 PM2024-02-24T12:25:30+5:302024-02-24T12:26:08+5:30
Milind gunaji: मिलिंद गुणाजी यांनी मृत्यूदाता हा सिनेमा साईन केला होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मात्र, ऐनवेळी मिलिंद यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. या नकारामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी. देवदास, फरेब, विरासत अशा कितीतरी बॉलिवूड सिनेमांमध्ये कधी नायक तर कधी खलनायक होत त्याने लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. विशेष म्हणजे एक काळ असा होता ज्यावेळी बॉलिवूड दिग्दर्शक त्यांच्या दारापुढे अक्षरश: रांग लावायचे. परंतु, विरासत या सिनेमाच्या वेळी असा एक किस्सा घडला ज्यामुळे त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली.
त्याकाळी मिलिंद गुणाजी यांची लोकप्रियता पाहता त्यांच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी तब्बल १७ ते १८ सिनेमा साइन केले होते. मात्र, 'विरासत' या सिनेमाच्यावेळी असं काही घडलं ज्यामुळे त्यांच्याविषयी अफवा पसरली. 'विरासत'सोबतच त्यांना 'मृत्यूदाता' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. या सिनेमात बॉलिवूडचा शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती. मात्र, मिलिंद गुणाजी यांना बिग बींसोबत काम करायचं नाही, अशी चर्चा त्यावेळी रंगली. अलिकडेच मिलिंद गुणाजी यांनी इट्स मज्जाच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यावेळी नेमका काय किस्सा घडला होता ते सांगितलं.
नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
"माझ्या आठवणीत आहे त्याप्रमाणे मी विरासत चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी माझे सगळे मोठे चित्रपट सुरु होते. मृत्यूदाता नावाचा सिनेमाही मी साइन केला होता. या सिनेमात मी मुख्य खलनायकाचं काम करत होतो. यात अमिताभ बच्चन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होते.त्याचवेळी विरासतच्या सेटवर अपघात झाला काहीतरी आणि सगळ्या डेट बदलल्या. मी ज्या डेट मृत्यूदातासाठी दिल्या होत्या त्या आणि या चित्रपटाच्या तारखा क्लॅश होऊ लागल्या. मला जाणवलं की, आपण हा चित्रपट नाही करु शकत. उगाच कुणाला खोट्या आशेवर कशाला ठेवायचं. मी मेहूल कुमार यांना स्पष्ट सांगितलं की मी इथे अडकलो आहे. त्यामुळे कदाचित मृत्यूदाता नाही करु शकणार. त्यावेळी मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की अमिताभ बच्चनसोबत काम करायला मिळतंय, एवढी मोठी संधी आहे काय करु पण..", असं मिलिंद गुणाजी यांनी सांगितलं
पुढे ते सांगतात, "त्यानंतर मग काही दिवसांनी हिंदी, इंग्लिश मॅगझीन्समध्ये याची बातमी छापून यायला लागली की, मिलिंद गुणाजी सारखा नवखा कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला नकार देतोय वगैरे. मी म्हटलं हे काय नवीन कारण मी असं काहीच केलं नव्हतं. मी त्यांच्यासोबत काम करायला नकार दिलाच नव्हता. मी का त्यांच्या वाकड्यात शिरू. पण म्हटलं हे प्रकरणं सोडवलं पाहिजे. ज्यामुळे मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची अपॉइमेंट मिळतीये का पाहा. त्यानंतर त्यांची अपॉइटमेंट मिळाली. त्यांच्या सेक्रेटरीने ते सध्या कुठे शूट करतायेत हे सांगितलं. मी त्या सेटवर पोहोचलो त्यावेळी अमिताभ बच्चन त्यांचा शॉट देऊन व्हॅनिटीमध्ये जात होते. मला पाहून ते थांबले. मी त्यांना सांगितलं, 'ज्या चर्चा आहेत तसं काहीच नाही' त्यावर ते म्हणाले, 'अरे तू काळजी करु नकोस. आम्हाला माहित असतं काय खरं आहे आणि काय खोटं. हे मॅगझीनकडे वगैरे लक्ष द्यायचं नाही." त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर मी निर्धास्त झालो.
दरम्यान, मिलिंद गुणाजी यांनी मराठीसह अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक टिव्ही शोमध्ये सुद्धा ते झळकले आहेत. यात भटकंती हा त्यांचा कार्यक्रम तर छोट्या पडद्यावर तुफान गाजला होता.