ही आहे महमूद यांची बहीण; पडद्यावर चक्क सख्ख्या भावासोबतच केला होता रोमान्स, भडकले होते लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:00 AM2021-09-29T09:00:00+5:302021-09-29T09:00:02+5:30
महमूद यांची एक सख्खी बहिणही आहे. ती सुद्धा अभिनेत्री. नाव काय तर मीनू मुमताज.
विनोदवीर, कॉमेडीचा बादशहा महमूद यांचा आज वाढदिवस. 29 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेले महमूद केवळ कॉमेडियन नव्हते तर दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेतेही होते. आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये महमूद यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. 23 जुलै 2004 ला बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अॅक्टरने जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या अभिनयाचे लोक आजही वेडे आहेत. याच महमूद यांची एक सख्खी बहिणही आहे. ती सुद्धा अभिनेत्री. नाव काय तर मीनू मुमताज. आज महमूद यांच्या याच बहिणीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही दशकांपूर्वी महमूद व मीनू मुमताज या बहिण-भावाच्या जोडीनं मोठा वाद ओढवून घेतला होता. होय,नात्यानं बहिण-भाऊ असलेली ही जोडी पडद्यावर रोमान्स करताना दिसली होती.
तब्बल 63 वर्षांपूर्वीची ही घटना. महमूद यांचा त्याकाळी मोठा दरारा होता. अगदी हिरोपेक्षाह अधिक मानधन घेणारे कॉमेडी कलाकार म्हणून ते ओळखले जात. याचकाळात 1958 साली ‘हावडा ब्रिज’ हा सिनेमा रिलीज झाला आणि तो पाहून लोक भडकले होते. होय, बहिण भावाचा पडद्यावरचा रोमान्स लोकांच्या पचनी पडला नव्हता. यावर प्रचंड टीका झाली होती.
मीनू यांचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी झाला होता. देविका रानीने मीनू यांना ब्रेक दिला होता. 1955 साली रिलीज ‘घर घर में दिवाली’ हा मीनू यांचा पहिला सिनेमा. यात त्यांनी गावात राहणा-या एका डान्सरची भूमिका साकारली होती. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘सखी हातिम’ या चित्रपटामुळे. यात त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती.
1963 मध्ये दिग्दर्शक सैयद अली अकबर यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं.मुमताज यांना मीनू हे नाव मीना कुमारी यांनी दिलं होतं. एक दिवस अचानक मीनू यांच्या नजरेसमोर अंधारी आली आणि त्यांची स्मृतीच नष्ट झाली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपासून त्यांच्या डोक्यात ट्यूमर होता. त्यांच ऑपरेशन देखील झालं होतं. त्यांचा जीव वाचला. सध्या त्या कॅनडामध्ये आहे.