लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:03 PM2022-04-06T17:03:10+5:302022-04-06T17:04:03+5:30
Shahid kapoor: २०१६ साली शाहिदचा 'उडता पंजाब 'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर मीराने शाहिदला सोडण्याचा निर्णय घेतला होता.
बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल म्हणून अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याकडे पाहिलं जातं. या जोडीच्या लग्नाला जवळपास ७ वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांच्याकडे पाहिल्यावर अवघ्या काही महिन्यांपूर्वीच यांचं लग्न झाल्यासारखं वाटतं. अनेकदा ही जोडी जाहीरपणे एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. मात्र, एक काळ असा होता जेव्हा लग्नाच्या काही दिवसांमध्येच मीराने शाहिदला सोडून जायचा निर्णय घेतला होता. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक जीवनातील हाच किस्सा चर्चिला जात आहे.
२०१६ साली शाहिदचा 'उडता पंजाब 'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर मीराने शाहिदला सोडण्याचा निर्णय घेतला होता.
'उडता पंजाब' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच शाहिद आणि मीराचं लग्न झालं होतं. मात्र, यावेळी चित्रपटातील लूक शाहिदने काही काळ तसाच कॅरी केला होता. यात त्याचे वाढलेल्या केसांची एक वेणी बांधली होती. शाहिदचा हाच लूक पाहून मीराला जबर धक्का बसला होता. याविषयी त्याने एका मुलाखतीमध्येही सांगितलं आहे.
"ज्यावेळी आमचं नवीनच लग्न झालं होतं. त्यावेळी एक मजेशीर किस्सा घडला होता. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मी मीराला घेऊन उडता पंजाब पाहायला घेऊन गेलो होतो. हा चित्रपट आम्ही एडिटिंग रूममध्ये बसून पाहिला होता.हा चित्रपट पाहात असताना मीरा माझ्या बाजूला बसली होती. मात्र, नंतर हळूहळू करत ती माझ्यापासून दूर जाऊ लागली", असं शाहिद म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "तिचं हे विचित्र वागणं पाहून मला प्रश्न पडला हिला अचानक काय झालं. कारण, आमचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे एकमेकांविषयी फारशी माहितीदेखील आम्हाला नव्हती. त्यामुळे मला मोठा प्रश्न पडला होता. मात्र, याच काळात मी ज्या पद्धतीने ऑन स्क्रीन दिसतो तसाच खऱ्या आयुष्यातदेखील आहे का? असा प्रश्न मीराने मला विचारला. इतकंच नाही तर यापुढे मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही, असंही तिने मला सांगितलं. तिचं हे वाक्य ऐकल्यावर रिल लाइफ आणि रिअल लाइफ दोन्ही वेगवेगळ्या आहेत हे मी तिला समजावून सांगितलं. "
दरम्यान, 'उडता पंजाब' हा चित्रपट ड्रग्स या अंमली पदार्थांवर आधरित आहे. यात ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुणाई, त्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम, ड्रग्सची तस्करी या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं आहे.