Mere Desh Ki Dharti Movie Review : 'मिर्झापूर' फेम दिव्यांदू शर्माने 'मेरे देश की धरती' सिनेमातून तरुणाईला दिला अॅग्रो बिझनेसचा गुरुमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:12 PM2022-05-06T17:12:56+5:302022-05-06T17:21:09+5:30
Mere Desh Ki Dharti Movie Review:चित्रपट हा केवळ समस्या दाखवण्याचं माध्यम नसून त्यावर उपाययोजनाही सुचवल्या जाऊ शकतात हे दिग्दर्शक फराझ यांनी पटवून दिलं आहे. जाणून घ्या कसा आहे मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा (Divyandu Sharma)चा हा सिनेमा..
कलाकार : दिव्यांदू शर्मा, अनुप्रिया गोएंका, अनंत विधात, इनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर
निर्माते : वैशाली सरवणकर (कार्निवल मोशन पिक्चर्स)
दिग्दर्शक : फराझ हैदर
शैली : ड्रामा
कालावधी : १ तास ५१ मिनिटे
स्टार- तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे
शेतीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, तरीही इथला शेतकरी आत्महत्या का करतो? शहरात नोकरी-धंद्यांसाठी संघर्ष करावा लागूनही तरुणाई गावाकडून शहराकडे का धाव घेतेय? योग्य विचारांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ लाभल्यावरही शेती व्यवसायाला गती मिळू शकणार नाही का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यावर उपाय सुचवण्याचं काम या चित्रपटात करण्यात आलं आहे. आज उच्चशिक्षण घेऊनही तरुणाई बेरोजगार आहे. अपेक्षेप्रमाणं काम मिळत नाही. मिळालंच तर बॅासची हुजरेगिरी करावी लागते, पण कोणीही शहरांकडून गावांकडं जात शेतीचा पर्याय निवडायला तयार नाही. १९६७मध्ये रिलीज झालेल्या 'उपकार' सिनेमातील 'मेरे देश की धरती...' हे गाणं प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारं आहे. दिग्दर्शक फराझ हैदर यांनी याच शीर्षकानं हा चित्रपट बनवला आहे, जो आजच्या काळात खूप गरजेचा आहे. समाजापर्यंत उपयुक्त विचार पोहोचवणारा आहे.
कथानक : हि कहाणी आहे व्यवसायानं इंजीनियर असणाऱ्या अजय आणि समीर दोन मित्रांची... नोकरी करणाऱ्या अजयला स्वत:चा नवीन स्टार्ट-अप सुरू करायचाय, तर समीर झोनल हेड बनण्याच्या प्रतीक्षेत आहे. झोनल हेड बनल्यावर त्याला गर्लफ्रेंडशी लग्न करायचं आहे, पण दोघांचीही स्वप्नं धुळीस मिळतात. वडिलांनी घरातून बाहेर काढल्यानं अजय आणि प्रमोशन न झाल्यानं समीर असे दोघेही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. एखाद्या गावी जाऊन आत्महत्या करायचं ठरवतात. गावामधलं वास्तव पाहिल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्यात जागृत होते. ते काय करतात ते चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : सकारात्मक विचारसरणीतून लिहिण्यात आलेल्या या चित्रपटाची पटकथाही चांगली आहे. प्रत्येक कॅरेक्टरला योग्य वाव देत दिग्दर्शकांनी आपलं म्हणणं यशस्वीपणे मांडलं आहे.
चित्रपट हा केवळ समस्या दाखवण्याचं माध्यम नसून त्यावर उपाययोजनाही सुचवल्या जाऊ शकतात हे दिग्दर्शक फराझ यांनी पटवून दिलं आहे. आजचं वास्तव मांडताना त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेला धारेवर न धरता किंवा राजकारण न आणता माणूस म्हणून आपण काय करू शकतो याचं उदाहरण सादर केलं आहे. हे सर्व करताना चित्रपटाची गती थोडी कमी झाली आहे. काही दृश्यांमध्ये बराच वेळ घालवला आहे. मध्यंतरापर्यंत नायकांचा नोकरीमधील स्ट्रगल आहे. मध्यंतरानंतर ते गावी पोहोचतात, पण वातावरण निर्मितीत बराच वेळ गेला आहे. त्यामुळे शेती आाणि उरलेल्या कामांसाठी फार कमी वेळ देत शेवट घाईघाईत उरकण्यात आल्यासारखा वाटतो. शेवट चांगला झाला आहे. 'मेरे देश की धरती' हे गाणं चांगलं झालं आहे. कॅमेरावर्क चांगलं आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम आहे.
अभिनय : डझनभर चित्रपट केल्यानंतर 'मिर्झापूर' या वेब सिरीजमध्ये मुन्नाच्या रूपात खऱ्या अर्थानं लाइमलाईटमध्ये आलेल्या दिव्येंदू शर्मानं अजयची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. अनंत विधातनं समीरच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत. विशेषत: बॅासच्या केबिनमध्ये घुसून आपल्या मनातील राग व्यक्त करण्याच्या दृश्यात त्याच्यावर टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव होईल. अनुप्रिया गोएंकानं साकारलेली गांव की छोरी तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आणि छान वाटते. इनाम्युलहकने पप्पनची व्यक्तिरेखा अगदी गंमतीशीर पद्धतीनं साकारली आहे. रुजुता शिंदेनं समीरच्या गर्लफ्रेंडची छोटीशी भूमिकाही चांगली साकारली आहे. ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, कमलेश सावंत, दलिप ताहील, फारुख झफर यांनी लहान भूमिकांमध्येही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : वर्तमान परिस्थितीचं भान राखून समाजासाठी पोषक ठरावा असा विचार देण्याचा यशस्वी प्रयत्न.
नकारात्मक बाजू : सिनेमाची गती काहीशी मंद असून, शेती करण्याच्या प्रक्रियेसाठी आणखी वेळ देण्याची गरज होती.
थोडक्यात : भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही शेती हा व्यवसाय होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाला अभ्यास आणि सकारात्मक विचारांची जोड दिली तर काहीही अशक्य नसल्याचं सांगणाऱ्या या चित्रपटात जरी मोठे स्टार्स नसले तरी एकदा तरी पहायला हवा.