मिथिला म्हणते इरफान शिवाय ‘कारवां’चे प्रमोशन अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 05:12 PM2018-07-25T17:12:55+5:302018-07-25T17:19:25+5:30
अभिनेत्री मिथिला पालकर ‘कारवां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर इरफान खान आणि दलकीर सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘गर्ल इन द सिटी‘ आणि ‘लिटिल थिंग्ज’ या वेब सीरिजमधून तरूणाईच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मिथिला पालकर ‘कारवां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर इरफान खान आणि दलकीर सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे अभिनेता इरफान खान यावेळी उपस्थित राहू शकत नाही आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय हे प्रमोशन अपूर्ण वाटत असल्याचे मिथिलाने म्हटले आहे.
‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचं संवाद लेखन करणाऱ्या आकर्ष खुराना यांनी ‘कारवां’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करत असून इरफान खान या प्रमोशनला उपस्थित नसल्यामुळे त्याची कमतरता प्रत्येक टीम मेंबरला जाणवते आहे. त्यामुळेच मिथिलाने एक पोस्ट करत इरफानला प्रचंड मिस करत असल्याचे सांगितले आहे.
‘इरफानच्या आजारपणाची माहिती मिळताच प्रचंड धक्का बसला होता. मात्र ते खंबीर आहेत आणि आमचे प्रेम आणि प्रार्थनादेखील त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे ते लवकर बरे होतील अशी आम्हाला आशा आहे. मात्र एक खंत आहे. ‘कारवां’च्या प्रमोशनसाठी ते हवे होते. त्यांच्याशिवाय हे प्रमोशन पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी चित्रपटाच्या सेटवर प्रत्येकाचं मन जिंकलं होतं.त्यांच्यामुळेच कारवामध्ये जीव आला आहे, त्यामुळे आज ते प्रमोशनला नसल्यामुळे हे प्रमोशन अपूर्ण असल्याचे मिथिला म्हणाली.
मिथिलाने तिला अभिनयात वेगवेगळे प्रयोग करायला आवडत असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की, ‘वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे माझा जास्त कल असतो. मला गायन, डान्स व अभिनय अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला फार आवडतात. आता मला स्विमिंग शिकायचे आहे. मला जितक्या गोष्टी करणे शक्य आहे. त्या करायच्या आहेत.’
कारवां' चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.