Mithun Chakraborty : अनेक वर्षे माझा अपमान केला गेला..., सांगताना भावुक झालेत मिथुन चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:31 PM2022-11-14T13:31:41+5:302022-11-14T13:31:55+5:30
Mithun Chakraborty : बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून ज्याला लोकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. एकेकाळी मिथुन हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होते. पण इथपर्यंतचा स्ट्रगल सोपा नव्हता....
Mithun Chakraborty : बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून ज्याला लोकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. एकेकाळी मिथुन हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होते. पण इथपर्यंतचा स्ट्रगल सोपा नव्हता. प्रत्यक्ष इंडस्ट्रीत त्यांना अनेक अपमान पचवावे लागलेत. होय, काळ्या वर्णामुळे त्यांना खूप काही भोगावं लागलं. आज इतक्या वर्षानंतर हे सगळं सांगताना मिथुन भावुक झालेत. त्यांचे डोळे पाणावले.
सारेगामापा लिटिल चॅम्प्सच्या मंचावर मिथुन आयुष्यातील संघर्षाबद्दल बोलले. ते म्हणाले, ‘माझ्या रंगामुळे मला खूप काही सोसावं लागलं. माझा अपमान केला गेला. यामुळे मी अनेकदा रडलो. मी जे काही भोगलं ते इतरांच्या वाट्याला यावं, असं मला अजिबात वाटत नाही. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग असतो. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. पण मला माझ्या वर्णामुळे नको ते ऐकवलं गेलं. अनेक वर्षे लोकांनी माझ्या त्वचेच्या रंगामुळे माझा अपमान केला. मी उपाशी झोपायचो, ते दिवसही मी पाहिलेत. आज काय खायचं, कुठे झोपायचं हा प्रश्न मला छळायचा. त्या दिवसांत मी अनेक रात्री फुटपाथवर काढल्या.’
माझं बायोपिक कोणीही बनवू नये...
मी जे दु:ख भोगलं, ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यावर बायोपिक व्हावा, अशी माझी इच्छा नाही. माझी कथा कुणालाही प्रेरणा देणारी नाही. याऊलट अनेकांना मानसिक त्रास होईल. मी इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मोठी लढाई लढली, असंही मिथुन म्हणाले.
मिथुन यांना लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करुन ते पैसे मिळवत. डान्ससोबत त्यांना अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत आलेत. सुरुवातीला त्यांनी ज्युनिअर कलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर मृगया’ या सिनेमात त्यांना मोठी संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. पण त्यानंतरही त्यांचा स्ट्रगल कमी नाही झाला. त्यांना सिनेमे मिळायला बराच वेळ लागला. 1982 मध्ये मिथुन यांच्या ‘डिस्को डान्सर’ सिनेमानं बॉक्स आॅफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमाने मिथुन यांना यश व लोकप्रियता मिळवून दिली.