मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती करणार होता या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीसोबत लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:15 PM2018-07-03T12:15:51+5:302018-07-03T12:20:47+5:30
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीवर एका मुलीने बलात्काराचा आरोप लावला असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचे लग्न येत्या सात जुलैला मदालसा शर्मा या अभिनेत्रीसोबत होणार होते. त्यामुळे आता त्याचे लग्न नियोजित वेळी होईल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोह चक्रवर्ती लवकरच लग्न करणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये येत होत्या. त्याचे लग्न 7 जुलैला होणार होते. पण आता त्याच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप लावला असून पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात आणि त्याची आई अभिनेत्री योगिता बालीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्याचे लग्न आता नियोजित वेळी होईल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
मिमोहचे लग्न मदालसा शर्मा या अभिनेत्रीसोबत होणार होते. त्या दोघांचा काहीच महिन्यांपूर्वी साखरपुडा देखील झाला होता. मदालसाने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी अशा अनेक भाषिक चित्रपटांत काम केले आहे. मदालसाचे आई-वडील दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. मदालसाच्या वडिलांचे नाव सुभाष शर्मा असून ते एक नामवंत दिग्दर्शक आहेत तर तिची आई शीला शर्मा या अभिनेत्री आहेत. ‘नदिया के पार’, ‘यस बॉस’, ‘घातक’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या हिट चित्रपटात शीला शर्मा यांनी काम केले आहे. १९९८ मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शीला देवकीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांनी मधुबाला, दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
‘फिटींग मास्टर’ या तेलगू चित्रपटातून मदालसाने अॅक्टिंग डेब्यू केला. यानंतर मदालसा कन्नड चित्रपटांकडे वळली. यानंतर ‘एंजेल’ या हिंदी चित्रपटात ती दिसली. हा चित्रपट कोरिओग्राफर गणेश आचार्य याने प्रोड्यूस केला होता. याशिवाय ‘अ गर्ल विद द इंडियन एमेरोल्ड’ या जर्मन चित्रपटातही ती झळकली. यानंतर ‘पटियाला ड्रिम्स’ या पंजाबी चित्रपटात तिची वर्णी लागली.
योगिता बाली आणि त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती या दोघा मायलेकाविरोधात बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
२००८मध्ये ‘जिम्मी’ या चित्रपटातून मिमोहने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर महाअक्षयचे आणखी चार चित्रपट आले. पण तेही आपटलेत.