आशा भोसलेंच्या नातीसोबत नातं काय? मोहम्मद सिराजने सांगूनच टाकलं, म्हणाला- "मी तिच्याशिवाय राहू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:23 IST2025-01-27T10:22:38+5:302025-01-27T10:23:51+5:30
आशा भोसलेंच्या नातीसोबत अफेरच्या चर्चा, मोहम्मद सिराजने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

आशा भोसलेंच्या नातीसोबत नातं काय? मोहम्मद सिराजने सांगूनच टाकलं, म्हणाला- "मी तिच्याशिवाय राहू शकत नाही"
क्रिकेट आणि बॉलिवूडचा फार जवळचा संबंध आहे. अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींची अफेअर्सही होती. सध्या अशाच एका नव्या कपलची चर्चा रंगली आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिचं नाव क्रिकेटर मोहम्मद सिराजशी जोडलं जात आहे. जनाई आणि मोहम्मद सिराजचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोंमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता मोहम्मद सिराजने मौन सोडलं आहे.
नुकतंच जनाईने तिचा २३व्या वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीला कलाविश्वातील कलाकारांसोबतच काही क्रिकेटर्सनेही हजेरी लावली होती. जनाईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमधील जनाई आणि मोहम्मद सिराजच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होता. अखेर यावर मौन सोडत मोहम्मद सिराजने जनाईसोबतचं त्याचं नेमकं नातं काय ते सांगूनच टाकलं आहे.
मोहम्मद सिराजने जनाईसोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत त्यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे. "माझ्या बहिणीसारखी कोणी बहीण नाही. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. जसं चंद्र ताऱ्यांमध्ये एक आहे तशीच माझी बहीण हजारोंमध्ये एक आहे", असं त्याने म्हटलं आहे. जनाईनेदेखील मोहम्मदसोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीला शेअर करत "मेरे प्यारे भाई" असं कॅप्शन दिलं आहे. जनाई आणि मोहम्मद यांनी त्यांच्यातील बहीण-भावाचं नातं सांगत अफेअरच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.