मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:28 PM2019-08-19T14:28:00+5:302019-08-19T14:33:25+5:30
मोहनिश बहलने हम आपके है कौनला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटातील त्याचे सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाला नुकतीच पंचवीस वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिकांमध्येही याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
या चित्रपटातील प्रेम आणि निशाची जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला. चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले आणि त्यांनी हा दिवस साजरा केला होता.
हम आपके है कौन या चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने एका रेडिओ वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मोहनिश बहलने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेसचे काही किस्से सांगितले. मोहनिशने सांगितले की, हम आपके है कौन या चित्रपटाच्याआधी मी मैंने प्यार किया या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात मी खलनायकाच्या भूमिकेत होतो. त्यामुळे हम आपके है कौन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी कोणत्याही दृश्यात खलनायकासारखा अभिनय करणार नाही ना... याकडे लक्ष देण्याची जबाबदारी लक्ष्मीकांतला देण्यात आली होती. त्यामुळे तो माझ्या अभिनयाकडे बारकाईने लक्ष द्यायचा. या चित्रपटात एक संवाद आहे की, रंग रूप में काली हो या गोरी हो... खुशनसीब वो जीजा है जिसकी साली हो... हा संवाद म्हणताना साली होती है आदी घरवाली म्हणताना मी काहीसा खलनायकासारखा अभिनय करतोय असे सगळ्यांना वाटत होते. पण मी रिटेक घेत हा संवाद चांगल्याप्रकारे म्हटला. आज या सेलिब्रेशनला मी लक्ष्मीकांतला खूप मिस करतोय.
हम आपके है कौन या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लल्लू प्रसाद ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.