महाकुंभमधील सुंदर डोळ्याच्या मोनालिसाला लागली लॉटरी, मिळाली सिनेमाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:51 IST2025-01-24T16:50:50+5:302025-01-24T16:51:24+5:30
Monalisa : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील जगातील सर्वात मोठ्या महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील एका तरूणीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. या तरुणीचं नाव मोनालिसा असून आता तर तिला मोठी लॉटरी लागली आहे.

महाकुंभमधील सुंदर डोळ्याच्या मोनालिसाला लागली लॉटरी, मिळाली सिनेमाची ऑफर
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील जगातील सर्वात मोठ्या महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील एका तरूणीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. या तरुणीचं नाव मोनालिसा (Viral Girl Monalisa) असून आता तर तिला मोठी लॉटरी लागली आहे. तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर आली आहे. चित्रपट निर्माते सनोज मिश्राने तिला त्याच्या आगामी चित्रपट 'द डायरी ऑफ मणिपूर'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली.
मोनालिसा आणि तिच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटात मोनालिसा एका निवृत्त आर्मी ऑफिसरच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल ते जून या कालावधीत ईशान्य भारतात होणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मोनालिसा गिरवणार अभिनयाचे धडे
शूटिंगपूर्वी मोनालिसाला तीन महिने मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाकुंभदरम्यान चाहत्यांच्या सततच्या त्रासामुळे मोनालिसा आणि तिचे वडील मध्य प्रदेशातील महेश्वर येथील त्यांच्या घरी गेले आहेत. चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि त्यांची टीम दोन दिवसांनी महेश्वरला पोहोचणार आहे आणि मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियांना भेट घेणार आहेत. न्यूजवर मोनालिसाची मुलाखत पाहिल्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा मोनालिसाच्या शोधात प्रयागराज महाकुंभला पोहोचले होते. तिथे त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांनी सनोज मिश्राला मोनालिसा आणि तिच्या वडिलांशी मोबाईलवर बोलायला लावले.
मोनालिसा आहे खूश
सनोज मिश्राच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात काम मिळण्याची ऑफर ऐकून मोनालिसा आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. त्यांच्या मते, या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबातील गरिबी संपून आर्थिक स्थिती चांगली होईल. मोनालिसाची आजी म्हणते की तिच्या नातीची अनेक वर्षांची इच्छा चित्रपटात काम मिळाल्याने पूर्ण होईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये मोनालिसाचा साधेपणा दिसल्याचे सनोज मिश्रा सांगतात. त्याने सांगितले की मोनालिसाच्या साधेपणाने तो प्रभावित झाला आणि त्याच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी आता रुपेरी पडद्यावरही झळकताना दिसणार आहे.