‘मनी हाईस्ट’च्या फोटोत पंकज त्रिपाठींना पाहून भडकले चाहते, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:25 PM2021-09-05T18:25:14+5:302021-09-05T18:26:19+5:30
नुसती कल्पना... पण तरीही पंकज त्रिपाठींचे चाहते संतापले....
नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय आणि हिट सीरिज ‘मनी हाईस्ट’चा (Money Heist 5) पाच एपिसोडचा 5 वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहेत. दीर्घकाळापासून प्रेक्षक या सीरिजची प्रतीक्षा करत होते. अखेर गेल्या 3 सप्टेंबरला हा सीझन रिलीज झाला. सध्या या सीरिजने सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या सीरिजच्या निमित्तानं मीम्सचा जणू पूर आला आहे. फनी पोस्ट व्हायरल होत आहेत. अशाच एका पोस्टमध्ये ‘मनी हाईस्ट’च्या कलाकारांची बॉलिवूड कलाकारांशी तुलना केली गेली आणि हे पाहून पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) चाहते भडकले.
‘मनी हाईस्ट’ बॉलिवूडमध्ये बनलीच तर त्यात बॉलिवूडच्या कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागेल, कोण कोण कोणकोणत्या भूमिकेत फिट बसेल, हे या पोस्टमध्ये दाखवण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये ‘मनी हाईस्ट’चा मास्टर माइंड अल्वारो मोर्टे अर्थात प्रोफेसरच्या भुमिकेत आयुष्यमान खुराणाला दाखण्यात आलं आहे. मोनिकाच्या रोलसाठी तापसी, रकैलच्या भुमिकेसाठी तब्बू, टोक्योच्या रोलसाठी आलिया भट, बर्लिनच्या रोलमध्ये रणदीप हुड्डा, नायरोबीच्या रोलमध्ये राधिका आपटे,डेनवरच्या भुमिकेत राजकुमार राव आणि ऑर्तुरोच्या रोलमध्ये पंकज त्रिपाठींची कल्पना केली आहे. म्हणायला ही नुसती कल्पना आहे. पण तरीही पंकज त्रिपाठींचे चाहते संतापले.
पंकज त्रिपाठींसाठी निवडलं गेलेलं पात्र चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. मग काय पंकज त्रिपाठींच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. पंकज त्रिपाठींची ऑर्तुरोच्या रोलसाठी कल्पना करण्यात आली आहे. ‘मनी हाईस्ट’मध्ये ऑर्तुरोची भुमिका Enrique Arce ने साकारली आहे आणि या पात्राबद्दल लोकांच्या मनात राग आहे. हे कॅरेक्टर सर्वात वाईट असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. ऑर्तुरो विश्वासघाती आहे, त्याच्यामुळे बँक लुटणारी प्रेक्षकांची आवडती गँग अडचणीत सापडते, असं सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता ही भुमिका पंकज त्रिपाठींच्या वाट्याला येत असेल तर चाहते नाराज होणारच.
म्हणायला ही केवळ कल्पना असली तरी चाहते अगदी कल्पनेतही या भुमिकेत पंकज त्रिपाठींची कल्पना करू शकत नाही, हेच यावरून सिद्ध होतंय. पंकज त्रिपाठींना इतका घाणेरडा रोल? आम्ही पंकज त्रिपाठींना या भुमिकेत बघूच शकत नाही, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिला आहे. एका चाहत्याने तर पंकज त्रिपाठीला ऑर्तुरो म्हटलं तर जीव घेईल, अशी टोकाची प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे.