चला तर प्रतिक्षा संपली! Money Heistच्या पाचव्या सीझनची रिलीज डेट आली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:19 AM2021-05-25T11:19:14+5:302021-05-25T11:22:49+5:30
Money Heist Season 5-Release Date : मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या ‘मनी हाईस्ट’चे चारही सीझन तुफान लोकप्रिय झालेत. या सीरिजचा पाचवा भाग कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष होते.
तुम्हीही ‘मनी हाईस्ट’ (Money Heist 5) या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा संपली आहे. जगभरातील चाहते ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन कधी येतो, याकडे नजरा लावून बसले होते. कारण हा या वेबसीरिजचा शेवटचा सीझन असणार आहे. अखेर नेटफ्लिक्सने (Netflix ) या वेबसीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन दोन भागांत असणार आहे. (Money Heist Season 5-Release Date)
नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सीरिजचा टीजर पोस्ट केला आहे. बँक आॅफ स्पेनमध्ये पोलिसांनी प्रोफेसरच्या गँगला घेरले असून चहूबाजूंनी गोळीबार सुरू आहे, असे या व्हिडीओत दिसते. हा व्हिडीओ शेअर करत नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट 5’ची रिलीज डेटही जाहीर केली. ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन यावर्षी येतोय. पहिला भाग 3 सप्टेंबर 2021 आणि दुसरा भाग 3 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या ‘मनी हाईस्ट’चे चारही सीझन तुफान लोकप्रिय झालेत. चोरी करताना घातलेले मास्क आणि बेला चाओ हे गाणेही तुफान लोकप्रिय झाले. ‘मनी हाईस्ट’ ही मूळ स्पॅनिश भाषेतील वेबसीरिज आहे. नेटफ्लिक्सवर ती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. अनोख्या कथेच्या जोरावर या वेबसीरिजने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो, असे याचे मूळ कथानक आहे. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
यापूर्वी मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्तेने सीरिज 5 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. पण काही कारणास्तव ही तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे.
नेटफ्लिक्सने खरेदी केले आणि नशीब बदलले...
‘मनी हाईस्ट’ सर्वप्रथम स्पॅनिश टीव्हीवर दाखवण्यात आली होती. तेव्हा ही सीरिज फ्लॉप ठरली होती. विशेष म्हणजे मेकर्सने दुस-या सीझननंतर ही सीरिज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नेटफ्लिक्सने ही सीरिज खरेदी केली आणि ती प्रचंड हिट झाली. सुरूवातीला या सीरिजचे प्रमोशनही झाले नाही. मात्र हळूहळू क्रेज इतके वाढले की, जगभरातील लोकांना या सीरिजने खिळवून ठेवले.