सलमान खानच्या रेडी चित्रपटाच्या लेखकाला अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:39 PM2023-09-16T12:39:48+5:302023-09-16T12:54:33+5:30
एका बांधकाम व्यावसायिकाने लेखक इकराम अख्तर यांच्याविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सलमान खानचा चित्रपट 'रेडी', टायगर श्रॉफचा 'बागी' आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचे लेखक इकराम अख्तर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची मुरादाबाद तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. ते २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
मुरादाबाद पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी इकराम अख्तर यांना मुंबईतून अटक केली होती. मुरादाबादचे बांधकाम व्यावसायिकाने यांनी इकरामविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर मुरादाबाद कोर्टाने इकराम अख्तर यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते.
इकराम अख्तर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांची 'इकराम अख्तर अॅक्टर फॅक्टर्स' नावाची एक अभिनय संस्थाही आहे. 'आय लव्ह दुबई' या चित्रपटाचा ते दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर 'रेडी', 'थँक्यू', 'नो प्रॉब्लेम', 'नई पडोसन', 'चलो इश्क लदाएं', 'जोरू का गुलाम', 'चल मेरे भाई', 'तेरा जादू चल गया' आणि 'छोटा चेतन' या चित्रपटांचे लेखन त्यांनी केलेले.
काय आहे प्रकरण?
मुरादाबादच्या बांधकाम व्यावसायिकाने 2016 मध्ये मुरादाबाद कोर्टात इकराम अख्तर यांच्या विरोधात केस दाखल केली होती. ‘आय लव्ह दुबई’ हा चित्रपट बनवण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक इकराम अख्तर यांनी त्याच्याकडून दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे. मात्र पैसे घेऊनही चित्रपट पूर्ण झाला नाही. दबावाखाली इकरामने दीड कोटी रुपयांचे धनादेश दिले पण तो बाऊन्स झाला. यानंतर कुलदीपने २०१६ मध्ये इकरामविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता.