‘चित्रपटाचे यश दर्शकांवर अवलंबून’

By Admin | Published: January 9, 2017 05:49 AM2017-01-09T05:49:45+5:302017-01-09T05:49:45+5:30

चित्रपटाचे यश हे दर्शकांवरच अवलंबून आहे,’’ असे श्रद्धा कपूरने म्हटलंय.

'Movie success depends on viewers' | ‘चित्रपटाचे यश दर्शकांवर अवलंबून’

‘चित्रपटाचे यश दर्शकांवर अवलंबून’

 - Janhavi Samant -

तामिळ सुपरहिट चित्रपट ‘ओके कन्मनी’चा सिक्वेल असणाऱ्या ‘ओके जानू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. लग्न करण्याची इच्छा नसणाऱ्या आणि एकत्र राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांची ही कथा. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही फेव्हरेट जोडी आहे. ‘‘आदित्य रॉय कपूरसोबत आपली केमिस्ट्री दर्शकांना आवडते. चित्रपटाचे यश हे दर्शकांवरच अवलंबून आहे,’’ असे  श्रद्धा कपूरने म्हटलंय. ‘सीएनएक्स’च्या संपादक जान्हवी सामंत यांच्याशी बातचीत करताना श्रद्धाने वैयक्तिक संबंधाबाबत स्पष्ट विचार मांडले.

 ‘ओके कन्मनी’ हा तमिळ चित्रपट दोन स्तरावरचा आहे. एक प्रौढ संबंध आणि दुसरा तारुण्यातील संबंध. हिंदी चित्रपटात हे कसे दाखविण्यात आलंय? लिव्ह इन संदर्भात तुझं काय म्हणणं आहे?
-हिंदी चित्रपट हा तमिळ चित्रपटासारखाच आहे. यातील पात्रं, भाषा आणि स्थळे बदलण्यात आलीत. नसिरुद्दीन शाह आणि लीला सॅम्पसन यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्यात. या दोघांमधील संबंध खूप प्रेमळ आहेत. मी या चित्रपटात ‘तारा’ या पात्रापासून प्रेरणा घेतलीय. मुली नेहमीच विचार करतात, लोक काय म्हणतील? परंतु ताराची भूमिका स्पष्ट आहे. मला लग्न करायचं नाही. मला हे पात्र आवडते.
  चित्रपटातील तुझा अनुभव कसा होता?
-अत्यंत मार्इंड ब्लोर्इंग, अमेझिंग. हिंदीत सांगायचं म्हणजे सुर्पब (हसत) सर्वतोपरी. मी हिंदी चित्रपटात काम करूनही माझं हिंदी तितकंसं चांगलं नाही. अमिताभ बच्चन यांचे हिंदी खूपच सुंदर आहे. नसिरुद्दीन शाह हे खूप मोठे कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची गोष्टच वेगळी आहे. ते आपल्या भूमिकेत केव्हा शिरतात हे कळतदेखील नाही.
  ‘ओके जानू’ हा रिमेक आहे. यापूर्वी त्याची मूळ कलाकृती तू किती वेळा पाहिलीस?
-केवळ एकदा. कोणताही चित्रपट करण्यापूर्वी त्याचे संवाद वाचले जातात. त्यानंतर तो चित्रपट करायचा किंवा नाही, हे ठरविले जाते. मला दिग्दर्शक शाद अली यांनी या चित्रपटाविषयी विचारले. मी तो चित्रपट पाहिल्यानंतर खूप आवडला. त्यानंतर हा चित्रपट करण्याचे मी ठरविले. या चित्रपटात मी आदित्यपेक्षा अधिक प्रगल्भ दिसल्याचे शादनेही म्हटले आहे. माझा आवाज खूप छान पद्धतीने वापरण्यात आला. त्यामुळे ही प्रगल्भता अधिक प्रमाणात दिसलीय.
  आदित्य आणि तुझी जोडी दर्शकांना आवडते. आशिकीनंतर हे दिसून आले. या चित्रपटातून तुमच्याकडून अधिक अपेक्षा केली जातीय?
- हो हे खरंय! ज्या पद्धतीने दर्शकांनी प्रेम आणि स्नेहभाव दर्शविलाय तो खूप जबरदस्त आहे. या चित्रपटाच्या प्रोमोवरून आमची केमिस्ट्री चांगली झालीय असं तरी वाटतंय.
  तुझ्या दृष्टीने कोणती जोडी अधिक भावते?
- शाहरुख-काजोल आणि वहिदा-गुरुदत्त ही जोडी अधिक चांगली आहे.
 ‘ओके जानू’विषयी तू अधिक काय सांगशील? यामध्येही तू बाईक चालविलीय?
-मला बाईक राईड आवडते हे खरंय. परंतु, तो कथानकाचा भाग होता. ‘ओके जानू’ हा चित्रपट दोन जोडप्यांचा आहे. ते लग्न करु इच्छित नाहीत. लिव्ह इनमध्ये राहण्याची त्यांची इच्छा आहे. नसिरुद्दीन शाह यांना या भूमिकेविषयी ज्या वेळी हे कळाले, त्या वेळी त्यांना धक्का बसला. लिव्ह इन रिलेशनशिप आणि मी? असा त्यांचा प्रश्न होता.
 एखाद्या रिमेक चित्रपटात काम करणे किती सोपे असते?
-एखादा चित्रपट जर लोकांना आवडत असेल तर त्याचा रिमेकही लोकांना आवडतो, असे मला वाटते. रिमेक चित्रपटात काम करणे म्हणजे अर्धे काम करणे असते, असे तरी मला वाटत नाही.
  ‘दंगल’ चित्रपटासंदर्भात काय सांगशील?
- मी हा चित्रपट पाहून खूपच भारावून गेले. चित्रपट पाहून घरी गेल्यानंतर रात्री ११ वाजता आमिर खान यांना फोन करून हा चित्रपट आवडल्याचे सांगितले.
  तुझ्याविषयी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांविषयी काय सांगशील?
- मला वाटते बातम्या प्रंिसद्ध करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा केली असती तर अधिक चांगले झाले असते. बातम्यांमध्ये आलेल्याप्रमाणे काहीही झालेले नाही. माझ्या वडिलांना याची माहिती आहे. त्यांनी मला सांगितले की, अशा गोष्टींवर आपला वेळ वाया घालवू नकोस.
  बंगळुरुच्या घटनांबाबत काय सांगशील?
- माझ्या आईने मला सांगितलंय. गप्प बसता कामा नये. आपण बोलले पाहिजे. बंगळुरूमधील घटना अत्यंत दु:खद आहे. लोक समोर उभारले आहेत आणि काहीही करीत नाहीत हे पाहून धक्का बसला. कपड्यांबाबत मुलींना दोष दिला जात असला तरी या ठिकाणी पहिल्यांदा छेडछाड कोणी केली, हेही लक्षात घेतले पाहिजे.
  मराठी चित्रपटात कधी येणार आहेस?
- अरे मला कुणी तरी आॅफर द्या! मी सैराटची डीव्हीडी आणली आहे. सध्या मला वेळ नाही, परंतु, जसा वेळ मिळेल, तशी ही डीव्हीडी मी पाहीन. मराठी सिनेमांमधून चांगले विषय हाताळले जात आहेत, याबद्दल मला आनंद होतोय.

Web Title: 'Movie success depends on viewers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.