तारे जमीन पर या चित्रपटातील दर्शिल सफारी झळकणार क्विकीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 08:22 AM2017-02-15T08:22:22+5:302017-02-15T13:52:22+5:30
तारे जमीन पर या चित्रपटात आमिर खानची महत्त्वाची भूमिका असली तरी या चित्रपटाचा खरा हिरो हा दर्शिल सफारी हा ...
त रे जमीन पर या चित्रपटात आमिर खानची महत्त्वाची भूमिका असली तरी या चित्रपटाचा खरा हिरो हा दर्शिल सफारी हा बालकलाकार होता. या चित्रपटात आमिरची एंट्री मध्यांतरानंतर झाली होती, तोपर्यंत केवळ इशानने आपल्या अभिनयाच्या ताकदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः आमिर खानने केले होते. दर्शिलची या चित्रपटासाठी निवडदेखील आमिरनेच केली होती. या चित्रपटातील दर्शिलचे काम प्रेक्षकांना, समीक्षकांना प्रचंड भावले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारदेखील मिळाला होता. या चित्रपटानंतर दर्शिलने बम बम बोले, झोकोमॉन आणि मिडनाईटस चिल्ड्रन या चित्रपटात काम केले होते. तसेच त्याने त्याचे नृत्य कौशल्य झलक दिखला जामध्ये दाखवले होते. एमटिव्हीच्या ये है आशिकी या कार्यक्रमातदेखील तो झळकला होता. आता इशान एका चित्रपटात झळकणार आहे. इशान मोठा झाल्यानंतरचा त्याचा हा पहिला चित्रपट असणार आहे. क्विकी असे या चित्रपटाचे नाव असून किशोरवयीन प्रेमकथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप अतलुरी करणार असून निर्मिती टॉनी डिसोझा, अमूल विकास मोहन आणि नितीन उपाध्याय यांची आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये दर्शिलचा खूपच वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्याने छोटीशी दाढी ठेवली असून केसाचीदेखील हेअरस्टाईल खूप वेगळी केलेली आहे.
दर्शिल या चित्रपटात झळकण्यासोबतच सध्या रंगभूमीवर व्यग्र आहे. कॅन आय हेल्प यू या त्याच्या पहिल्या नाटकाची तयारी तो गेल्या सप्टेंबरपासून करत आहे.
क्विकी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही महिने तरी वाट पाहावी लागणार आहे.
दर्शिल या चित्रपटात झळकण्यासोबतच सध्या रंगभूमीवर व्यग्र आहे. कॅन आय हेल्प यू या त्याच्या पहिल्या नाटकाची तयारी तो गेल्या सप्टेंबरपासून करत आहे.
क्विकी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही महिने तरी वाट पाहावी लागणार आहे.