धाग्यांमध्ये विणलेली माय-लेकीची भावुक कहाणी! मृणाल कुलकर्णींची हिंदी वेबसीरिज 'पैठणी', ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:36 PM2024-11-07T13:36:41+5:302024-11-07T13:42:24+5:30
मृणाल कुलकर्णींच्या नव्या हिंदी वेबसीरिजचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज झालाय (paithani)
मृणाल कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री. मृणाल यांनी केवळ मराठीच नव्हे तर 'सोनपरी', 'द काश्मिर फाईल्स' अशा प्रोजेक्टमधून हिंदी इंडस्ट्री अन् बॉलिवूडमध्येही त्यांच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. मृणाल कुलकर्णी यांची नवीन हिंदी वेबसीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसीरिजचं नाव आहे 'पैठणी'. मृणाल कुलकर्णींची ही वेबसीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे. नुकतंच सोशल मीडियावर 'पैठणी' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय.
मृणाल कुलकर्णींच्या 'पैठणी'चा ट्रेलर
नुकताच सोशल मीडियावर 'पैठणी' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय. या वेबसीरिजमध्ये दिसतं की मृणाल कुलकर्णी हातमागावर पैठणी साड्या विणताना दिसतात. साडी बनवणं ही एक कला आहे असं त्या मानतात. मृणाल कुलकर्णींनी विणलेल्या पैठणी साड्यांची पंचक्रोशीत खूप चर्चा असते. पण अशातच मृणाल यांना कमी दिसायला लागतं. त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी समस्या निर्माण होते. तेव्हा त्यांची मुलगी आईला कशी मदत करते? याची भावुक कहाणी 'पैठणी' वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
कुठे आणि कधी पाहायला मिळणार 'पैठणी'?
झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्वर 'पैठणी' वेबसीरिज रिलीज होणार आहे. ही वेबसीरिज १५ नोव्हेंबरला झी ५ मध्ये घरबसल्या बघायला मिळणार आहे. वेबसीरिजमध्ये मृणाल यांनी गोदाची भूमिका साकारलेली दिसतेय. तर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा सिंग झळकताना दिसणार आहे. मृणाल कुलकर्णी या 'द काश्मिर फाईल्स'नंतर या हिंदी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. सर्वांना ही आगळीवेगळी 'पैठणी' अनुभवण्याची उत्सुकता आहे.