Mrs Movie: सान्या मल्होत्राच्या 'मिसेस' सिनेमाची इतकी चर्चा का होतेय? ही आहेत पाच कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:11 IST2025-02-10T16:10:52+5:302025-02-10T16:11:29+5:30

 'मिसेस' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सान्या मल्होत्राचा हा सिनेमा पाहणं का महत्वाचा आहे, जाणून घ्या (mrs)

mrs movie actress sanya malhotra zee 5 remake of the great indian kitchen | Mrs Movie: सान्या मल्होत्राच्या 'मिसेस' सिनेमाची इतकी चर्चा का होतेय? ही आहेत पाच कारणं

Mrs Movie: सान्या मल्होत्राच्या 'मिसेस' सिनेमाची इतकी चर्चा का होतेय? ही आहेत पाच कारणं

सध्या सोशल मीडियावर एका सिनेमाची अफाट चर्चा सुरु आहे तो म्हणजे 'मिसेस' (mrs). सान्या मल्होत्राने (sanya malhotra) या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. ओटीटीवर रिलीज झालेला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणं आवश्यक होतं अशी मागणी होतेय. 'मिसेस' सिनेमा पाहणं प्रत्येक महिलांना आणि पुरुषांनाही का आवश्यक आहे? या सिनेमाची कथा समाजासाठी का महत्वाची आहे? जाणून घ्या पुढील पाच कारणं.

'मिसेस' सिनेमा पाहणं महत्वाचं आहे कारण...

१. सोशल मॅसेज

'मिसेस' हा सिनेमा 'द ग्रेट इंडियन किचन' सिनेमाचा रिमेक आहे.  हा सिनेमा समाजाचा एक आरसा आहे. लग्न झाल्यावर सासरी गेलेल्या मुलीची कहाणी सिनेमातून दिसते. या मुलीच्या अनेक महत्वांकाक्षा असतात. परंतु सासरच्या पारंपरिक, रुढीवादी आणि संकुचित विचारसरणीच्या वातावरणात तिला राहावं लागतं. पुढे ही महिला सासरच्या त्रासाचा कसा सामना करते, हे सिनेमातून दिसतं. एक सुंदर सामाजिक संदेश 'मिसेस' सिनेमात पाहायला मिळतो.

२. पितृसत्ताक

'मिसेस' सिनेमात पितृसत्ताक पद्धतीचं चित्रण पाहायला मिळतं. जेव्हा नवीन मुलगी सासरी येते तेव्हा तिकडे पुरुषांची कशी सत्ता असते, या मुलीला नवरा-सासऱ्यांना विचारल्याशिवाय काही करता येत नाही. घरात पुरुषांना आवडेल तेच जेवण करावं लागतं. जेवणात काही कमी झालं तर लगेच नवरा, सासऱ्यांची बोलणी अन् टोमणे ऐकावे लागतात, याचं चित्रण पाहायला मिळतं.

३. शोषण

'मिसेस' सिनेमात लग्न केलेल्या महिलेचं नवरा आणि सासरच्या इतर मंडळींकडून कसं शोषण होतं, हे पाहायला मिळतं. हे शोषण शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतं. जेवण झाल्यावर सर्वांची भांडी आवरा, थकलेलं असूनही कोणीही या महिलेला विचारात घेत नाही. रात्री उशीरा झोपून तिला सर्वांच्या आधी लवकर उठावं लागतं. त्यामुळे 'मिसेस' सिनेमात स्त्रीचं होणारं शारीरिक आणि मानसिक शोषण पाहायला मिळतं. 




४. समाजाच्या विचारसरणीची झलक

२१ व्या शतकात महिला त्यांच्या पायांवर स्वतंत्रपणे उभ्या आहेत असं आपण कायम ऐकतो. महिला उच्चशिक्षण घेऊन स्वतःची कमाई करत आहेत. पण खरंच असं आहे का?लग्नानंतर महिलांना कोणत्या त्रासांना सामोरं जावं लागतं, काहीतरी करण्याची उमेद असूनही समाजाच्या संकुचित विचारांमुळे आणि असुयेमुळे लग्नानंतर महिलांची प्रगती किती मंदावते, याचं योग्य चित्रण  'मिसेस' सिनेमात दिसतं.

५. कलाकारांचा उत्तम अभिनय

 'मिसेस' सिनेमाची सर्वांत जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स. सान्या मल्होत्राने रीचा शर्माची भूमिका अक्षरशः जगली आहे. सान्याच्या उत्कृष्ट अभिनयाचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. याशिवाय कंवलजित सिंग यांनी साकारलेली सासऱ्यांची भूमिका आणि निशांत दहियाने साकारलेली दिवाकरची भूमिकाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. अशाप्रकारे  'मिसेस' सिनेमाची सध्या चांगलीच हवा असून हा सिनेमा झी ५ या ओटीटीवर बघता येईल.

 

 

Web Title: mrs movie actress sanya malhotra zee 5 remake of the great indian kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.