नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:07 IST2023-06-09T16:06:55+5:302023-06-09T16:07:43+5:30
शाह यांनी कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता मुसलमानांचा द्वेष करणं सध्या फॅशन झालीये असं विधान केलं होतं.

नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..."
अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले ज्यामुळे ते फारच चर्चेत आले होते. कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता त्यांनी मुसलमानांचा द्वेष करणं सध्या फॅशन झालीये असं विधान केलं होतं.आता त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी पलटवार केला आहे. ते इतके कट्टर कसे झाले आणि अशी विचित्र वक्तव्ये करत आहेत असं खन्ना म्हणाले.
नसीरुद्दीन शाह यांनी नुकतंच 'द केरळ स्टोरी' आणि 'द काश्मीर फाईल्स' सिनेमांचं नाव न घेता त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, आजरकाल उच्चशिक्षित लोकही चालाखीने मुसलमानांचा द्वेष करतात. हे प्रोपोगंडा पसरवण्याचे माध्यम आहेत असंही ते म्हणाले.
नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले आणि म्हणाले, " जर देशात कोणी सुरक्षित नसतील तर ते १०० कोटी हिंदू आहेत. एका अभिनेत्याला इतकी कट्टरता शोभा देत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर लव्ह जिहादला प्रमोट करणाऱ्या गँगमध्ये सामील व्हा. विचार करा नाहीतर लोकांना तुमचे सिनेमे बघणं बंद करावं लागेल."
मुकेश खन्ना यांनी व्हिडिओत साक्षी, श्रद्धा वालकर, अंकिता आणि कानपूरच्या हनुमान मंदिराची तोडफोड या गोष्टींचाही उल्लेख केला. याशिवाय राजस्थानमध्ये भरदिवसा एका टेलरचा गळा कापून खून केल्याच्या घटनेचाही उल्लेख केला. त्यांनी शाह यांना आपलं वक्तव्य मागे घेण्याचाही सल्ला दिला.