TikTokच्या घसरत्या रेटींगवर मुकेश खन्नाची ‘भीष्मवाणी’, हे तात्काळ बंद करणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:03 AM2020-05-22T11:03:23+5:302020-05-22T11:05:43+5:30
टिकटॉकचे रेटींग घसरल्याने मुकेश खन्ना खूश्श....!
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्ध युट्यूब युजर्स यांच्यात घमासान पाहायला मिळतेय. टिकटॉक युजर्स टिकटॉकच्या बाजूने तर युट्यूबर्स युट्यूबच्या बाजूने किल्ला लढवत आहेत, पण या युद्धाने टिकटॉक तोंडाला फेस आणला आहे. काही दिवसांपूर्वी फैजल सिद्दीकी या टिकटॉक स्टारने अॅसिड हल्ल्याचे उदात्तीकरण करणारा व्हिडीओ शेअर केला आणि टिकटॉकविरोधातील संताप आणखी वाढला. टिकटॉकने लगेच फैजलचे अकाऊंट ब्लॉक केले़ पण तरीही लोकांचा राग निवळला नाही. याचा परिणाम काय तर टिकटॉकची रेटिंग पडायला लागली, आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टिकटॉकची रेटिंग घसरल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘मित्रांनो, टिकटॉकशिवाय आणखीही करण्यासारखे खूप काही आहे जगात. कोरोना व्हायरच्या वाईट बातम्यांमध्ये एक चांगली बातमीही आली आहे, टिकटॉक नावाचा आणखी एक चीनी व्हायरस टिक टॉक टिक टॉक करत आपल्यापासून दूर होत आहे. त्याची रेटिंग 4.5 वरून 1.3 वर आली आहे. मी दिलेल्या सल्ल्यानुसार काही लोक टिकटॉकपासून दूर गेलेत, याचा मला विशेष आनंद आहे. लोक हळूहळू टिकटॉकवर बहिष्कार टाकत आहे. यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. चायनीज प्रॉडक्टच्या यादीत सर्वात पहिले नाव टिकटॉकचे ठेवा आणि त्याला देशातून हद्दपार करा. कारण हे अॅप तरूणांना बिघडवत आहे,’ असे मुकेश खन्ना यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलेय, ‘घड्याचा टिक टॉक टीक आवाज ऐकणे आनंददायी आहे. पण काही घटकेची लोकप्रियता मिळण्यासाठी टिक टॉक करणे हे फालतु लोकांचे काम आहे. हे बंद होणे गरजेचे आहे. मी या मोहिमेसोबत आहे. ’
यापूर्वी मुकेश खन्ना यांनी युट्यूबर कॅरी मिनाटीला पाठींबा दिला होता. टिकटॉकविरोधात आवाज उठवणा-या कॅरी मिनाटीला माझा पाठींबा आहे, असे मुकेश खन्ना यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर युट्यूबने कॅरी मिनाटीचा व्हिडीओ डिलीट केल्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.