'क्रिश' आणि 'रा-वन' सिनेमालाही टक्कर देईल, 'शक्तीमान'ची सिरीज, सिनेमाची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 12:59 PM2020-10-03T12:59:08+5:302020-10-03T12:59:32+5:30
'शक्तीमान' मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र आजही शक्तीमान प्रत्येकाच्या मनात आहे. शक्तीमान ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती.
नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर विविध मालिकांनी रसिकांची मनं जिंकली. आजही या मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. याच अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. भारताचा पहिला सुपरहिरो असलेला शक्तीमान बच्चेकंपनीसह सा-यांनाच भावला. नव्वदच्या दशकात या मालिकेने लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठलं होतं. कधी कुणी शक्तीमानच्या रुपात दिसायचं तर कुणी गंगाधर तर कुणी गीता विश्वासच्या रुपात दिसायचं अशी क्रेझ या मालिकेची सर्वसामान्यांवर पाहायला मिळत होती. शक्तीमान मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेता मुकेश खन्ना यांना तुफान लोकप्रियता मिळाली. आजही मुकेश खन्ना शक्तीमान म्हणूनच ओळखले जाते.
'शक्तीमान' मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र आजही शक्तीमान प्रत्येकाच्या मनात आहे. शक्तीमान ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. लॉकडाऊन दरम्यान ती पुन्हा प्रसारित केली गेली.सध्याच्या पिढीलाही शक्तीमान अनुभवता यावा यासाठी अभिनेते मुकेश खन्ना यांनी चक्क शक्तीमानची चित्रपटाची सिरीज बनणार असल्याची घोषणा केली आहे.एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनेही सिनमाच्या सिरीजसाठी होकार दिला आहे. यावेळी मुकेश खन्ना यांनी सांगितले की, जे काही बनवले जाईल ते 'क्रिश' आणि 'रा- वन'पेक्षा भव्यदिव्य असेल. हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.मला आनंद आहे की आता आम्ही धमाकेदार काहीतरी घेऊन परत येत आहोत.
सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षी जूननंतर सुरू होणार आहे. सिनेमाचे शिर्षक तेच असणार असून शक्तीमानची भूमिका कोण साकारणार आहे? सिनेमासाठी कोणते कलाकार झळकणार आहेत. याविषयीची माहिती समोर आली नसून लवकरच याविषयी अधिकृत घोषणाही करण्यात येईल.
याच निमित्ताने नवीन पिढीलाही नव्वदचा दशकात शक्तीमानने कशा प्रकारे धुमाकुळ घातला होता. तेच अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नव्या रूपात, नव्या ढंगातील शक्तीमानचा भव्यदिव्य रूप रुपेरी पडद्यावर पाहणे रसिकांसाठी एक मनोरंजनाची ट्रीटच असणार आहे.