स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 02:49 PM2023-06-22T14:49:38+5:302023-06-22T14:57:27+5:30
Mukesh khanna: मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे.
ओम राऊत(om raut) यांच्या आदिपुरुष हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. या सिनेमातील संवाद, कलाकारांचे कपडे यांवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चहुबाजूने या सिनेमाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यामध्येच आता शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी त्यांचं टीकास्त्र डागलं आहे. मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे.
अलिकडेच मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आदिपुरुष सिनेमातील संवादांवर आक्षेप घेतला आहे. तसंच रामायणाची खिल्ली उडवल्याचं म्हटलं आहे.
"भगवान शंकराने रावणाला आशीर्वाद दिला होता. या लोकांना साधी ही माहिती नाही आणि मोठमोठ्या बाता मारत आहेत. हे अत्यंत वाईट आहे. या लोकांना अजिबात माफ करायला नको. कालच मी माझ्या चॅनेलवर जाहीरपणे सांगितलं होतं की, या सिनेमाच्या संपूर्ण टीमला ५० डिग्री सेल्सिअसमध्ये एकत्र उभं करुन जाळून टाकलं पाहिजे", असं मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मला वाटलं होतं जो काही प्रकार घडतोय तो पाहून या लोकांनी चेहरे लपवले असतील. पण, हे लोक तर झालेल्या चुकीचं स्पष्टीकरण देत बसले आहेत. तसंच संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी तर सांगितलं होतं की या सिनेमात वाल्मिकींसारखी भाषा असेल. पण यांनी तर यांचं वेगळं वर्जन तयार केलं. तुम्ही स्वत:ला वाल्मिकींपेक्षा मोठं समजता का?
दरम्यान, 'आदिपुरुष' हा सिनेमा १६ जून रोजी रिलीज झाला. परंतु, हा सिनेमाला रिलीज झाल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एकीकडे ट्रोलिंग सुरु असतानाच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 500 ते 600 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 90 कोटींच गल्ला जमवला. तर दोनच दिवसात सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे.