‘शक्तिमान’ हादरला...! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:36 PM2021-05-13T14:36:33+5:302021-05-13T14:41:58+5:30
Mukesh Khanna : मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे..., शेअर केली भावुक पोस्ट
काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे, याचा मला अंदाजही नव्हता..., हे शब्द आहेत ‘शक्तिमान’ मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांचे. एकुलत्या एका बहिणीच्या निधनामुळे मुकेश खन्ना यांना मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे मुकेश खन्ना यांनी एकुलती एक बहिण गमावली. बहिणी कमल कपूरला शेवटपर्यंत आयसीयू बेड मिळाला नाही आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली. (Mukesh Khanna Sister's Death)
खुद्द मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.
मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बहिणीसोबत फोटो शेअर केला आहे. सोबत अत्यंत भावुक पोस्ट सुद्धा लिहिली आहे.
‘काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र मला अजिबात अंदाजा नव्हता की एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले़ तिच्या निधनामुळे मी हादरून गेलोय. माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 दिवस तिने कोरोनाशी लढा दिला होता. मात्र लन्ग्स कन्जेक्शनमुळे आम्ही तिला कायमचे गमावून बसलो. समजत नाही देव कोणता हिशोब चुकता करतोय? आज मी पहिल्यांदा आयुष्यात हादरलो आहे,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बहिणीच्या निधनाबद्दल सांगितले़ ते म्हणाले, माझ्या बहिणीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिने कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र तरीसुद्धा त्यांना श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आयसीयू बेडच्या शोधात होतो. मात्र शेवटपर्यंत तिला बेड नाही मिळाला आणि तिने आज अखेरचा श्वास घेतला. बहिणीचे अंत्यदर्शनही मी घेऊ शकलो नाही.
कालपरवा सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा पसरली होती. मुकेश खन्ना यांनी मी जिवंत आहे, ठणठणीत आहे असे सांगत त्यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले होते.