‘कबीर सिंग’ हा सिनेमा पाहून डॉक्टरला आला राग, पोलिसांकडे घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 11:19 AM2019-06-26T11:19:41+5:302019-06-26T11:27:50+5:30
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय.
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. मुंबईतील एक डॉक्टर यापैकीच एक . ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर मुंबईच्या या डॉक्टरने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या सिनमात शाहिद कपूरने एका सनकी आणि अग्रेसिव्ह डॉक्टरची भूमिका साकारली आहे. यामुळे डॉक्टर्सच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचा तक्रारकर्त्या डॉक्टरचा दावा आहे. चित्रपटातील हिरो दारूच्या नशेत ऑपरेशन करतो. हे दृश्य वैद्यकीय पेशाची प्रतिमा मलिन करणारे आहे,असेही या डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य राज्य मंत्री आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून त्याने या सिनेमाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा आणि प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवलेला आहे. ‘मी कबीर सिंग हा सिनेमा पाहण्यास नकार देतेय. मी शाहिदची खूप मोठी चाहती आहे. पण स्टॉकिंग कुठल्याहीप्रकारे न्याय्य ठरवल्या जाऊ शकत नाही, ते स्वीकार्य नाही,’ असे ट्वीट शोभा डे यांनी केले होते.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिनेही शाहिदच्या या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग करत, या चित्रपटाला विरोध करणारे ट्वीट केले होते. ‘कुणाचेही या चित्रपटातील महिला विरोधी कथानकाकडे लक्ष गेले नाही? फक्त इंटेन्स अॅक्टिंग? हे खरोखरचं व्यथित करणारे आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात. भारतात महिलांच्या सद्यस्थितीबद्दल काय अपेक्षा कराव्यात, हेच मला कळत नाही,’ असे ट्वीट तिने केले होते. ‘भूमिका निवडण्यापूर्वी कलाकाराने आपल्या जबाबदारीचे भान ठेवायला नको का?’ असा संतप्त सवालही तिने केला होता.
‘कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटाने 70.83 कोटींची कमाई केली. सध्या 100 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरु आहे. शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे.