हिमालयाच्या गुफेत राहत होता हा अभिनेता, 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील एका छोट्याशा सीनमुळे झाला होता प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 04:46 PM2020-11-28T16:46:24+5:302020-11-28T16:48:03+5:30
सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहत होते. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात ते राहिले. दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला होता. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं होते
चित्रपटसृष्टीत आजही काही कलाकार असे आहेत जे कितीही पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा मिळाली तरी त्यांचे पाय जमीनवरच असतात. जीवनशैली अत्यंत सामान्य असते. मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात जादू की झप्पी सीनमुळे प्रसिद्ध झालेले सफाई कर्मचारी, ज्यांना संजय दत्त जादूची झप्पी देतो. या कलाकाराचं नाव म्हणजे सुरेंद्र राजन.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहत होते. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात ते राहिले. दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला होता. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं होते.हा जवान या घरात चहाचं दुकान चालवत असे. १७ किमी डोंगरावरून खाली उतरत या ठिकाणाहून गावात जाता येतं. त्यामुळे ३-४ महिन्यांमधून एकदा खाली उतरत तेल, साबण आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डोंगरातून फुटलेल्या झऱ्यांमधून होते. ७०हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या सुरेंद्र राजन यांची चित्रकार आणि फोटोग्राफर अशीही ओळख आहे. त्यांना भटकंती आणि भ्रमंतीचा शौक आहे. देशातील कानाकोपऱ्यासह हंगेरी, ऑस्ट्रियाची सफर त्यांनी केली आहे. फिरण्याच्या या आवडीमुळे १६ वर्षे राजन यांनी भाड्याचे घरही घेतलं नव्हतं. कारमध्ये बसूनच त्यांनी देशभर भ्रमंती केली. लोकांना आपलं असं जगणं विचित्र वाटतं, मात्र पैशांच्या मागे आपण कधीही धावलो नाही असं ते सांगतात.
लॉकडाऊन काळात सुरेंद्र राजन यांनाही संघर्षाचा सामना करावा लागला होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये काम केल्यापासून संजय दत्तच्या संपर्कात असल्याचंही राजन यांनी सांगितलं होते. मात्र कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून संजय दत्तकडेही कधीच कोणत्याही प्रकारची मदत मागितली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. सुरेंद्र राजन यांच्याकडे असलेले सर्व पैसे संपले होते. या कठीण काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अन्नधान्य पुरवल्याची माहिती त्यांनी दिली होती. जेव्हा सुरेंद्र राजन यांच्याविषयी सोनू सुदला समजले तेव्हा त्याने सुरेंद्र यांना मदतीचा हात दिला होता.