‘संगीताचा प्रवास चिरंतन!’- पंडित जसराज
By अबोली कुलकर्णी | Published: March 13, 2019 06:33 PM2019-03-13T18:33:07+5:302019-03-13T18:34:31+5:30
पंडित जसराज यांनी ८९ वर्षे वयाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने ‘गोल्डन व्हॉईस- गोल्डन इअर्स पंडित जसराज’ या इव्हेंटचे आयोजन केले आहे. १५ मार्च रोजी ‘शन्मुखानंद’ हॉलमध्ये होणाऱ्या स्पेशल कॉन्सर्टमध्ये पंडितजींचा संपूर्ण प्रवास चित्रफीतीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.
अबोली कुलकर्णी
संगीत कुठे नाही? संगीत सर्वत्र आहे. या विश्वाच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावलेले आहे. संगीताची आराधना करा आणि आयुष्य समृद्ध करा, असा जीवनमंत्र पद्विभूषण संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी युवापिढीला दिला. पंडित जसराज यांनी ८९ वर्षे वयाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने ‘गोल्डन व्हॉईस- गोल्डन इअर्स पंडित जसराज’ या इव्हेंटचे आयोजन केले आहे. १५ मार्च रोजी ‘शन्मुखानंद’ हॉलमध्ये होणाऱ्या स्पेशल कॉन्सर्टमध्ये पंडितजींचा संपूर्ण प्रवास चित्रफीतीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा सुरेल संवाद...
* पंडित जसराज आणि पद्विभूषण संगीत मार्तंड पंडित जसराजपर्यंतचा प्रवास कसा होता?
- अत्यंत समृद्ध करणारा होता. आत्तापर्यंतच्या काळाने बरंच काही शिकवलं. आयुष्याने अनेक चढ-उतार पाहिले. पण, कधीही संगीताची साथ मी सोडली नाही. संगीतामुळेच माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला आहे.
* आत्तापर्यंत तुम्ही संगीताची प्रत्येक वेळ पाहिली आहे. तुमच्या मते, संगीताचा सुवर्णकाळ कोणता आणि कसा आहे?
- असं काही नाही. प्रत्येक काळ हा चांगलाच असतो. आताही मी पाहतो, नवीन मुलं छान गातात. त्यांचे प्रकार वेगळे असले तरीही त्यांचा ‘दर्द’ एकच आहे. ज्या उत्सुकतेने, प्रेमाने आणि आत्मविश्वासाने गातात ते सर्वांना आवडतं, मग अजून काय हवं आहे? युवापिढीही अतिशय उत्तम गात आहे, असे मला वाटते.
* तुम्ही आत्तापर्यंतच्या काळात तीन ते चार चित्रपटांमध्येच गाणी गायली आहेत. याचे काही खास कारण?
- नाही, असे नाहीये. चित्रपटांमध्ये गाणी गाणं मला फारच आवडतं अशातला भाग नाही. त्यावेळी कुणीतरी माझ्याकडून गाणी गाऊन घेतली. मला याच हिंदुस्थानी संगीतातच जास्त रस आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संगीत म्हणजे माझ्यासाठी खरंतर श्वास आहे.
* आजही तुमच्यामध्ये तीच एनर्जी आहे, याचे कारण काय?
- याचे कुठलेही खास कारण नाही. संगीतामुळे माझ्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे, तीच मला माझे कार्य करायला प्रेरणा देते.
* हिंदुस्थानी संगीतमध्ये युवा पिढीचे योगदान कसे आहे? युवा पिढी या संगीताला सांभाळू शकेल काय?
- नक्कीच. आजची युवापिढी खुप हुशार, बुध्दिवान आहे. नक्कीच ते हिंदुस्थानी संगीताला सांभाळू शकतील, असा मला विश्वास आहे. संगीताप्रती असलेलं समर्पण, त्याग वृत्ती त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.