माझे रोमॅँटिक हिरो बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले !- रजा मुराद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 02:22 PM2018-10-27T14:22:18+5:302018-10-27T14:58:02+5:30
रजा मुराद यांची ओळख आजही खलनायक म्हणूनच आहे. आजपर्यंत त्यांना आपण बहुतांश चित्रपटात खलनायकाच्याच भूमिकेत पाहिले आहे, मात्र रजा मुराद तब्बल ४८ वर्षानंतर ‘अंकल आॅन द रॉक्स’ या शॉर्टफिल्ममध्ये एका रोमॅँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-रवींद्र मोरे
बॉलिवूडचे दमदार व्हिलन म्हणून प्रसिद्ध असलेले रजा मुराद यांची ओळख आजही खलनायक म्हणूनच आहे. आजपर्यंत त्यांना आपण बहुतांश चित्रपटात खलनायकाच्याच भूमिकेत पाहिले आहे, मात्र रजा मुराद तब्बल ४८ वर्षानंतर ‘अंकल आॅन द रॉक्स’ या शॉर्टफिल्ममध्ये एका रोमॅँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेबाबत शिवाय त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...
* आपण या शॉर्टफिल्ममध्ये एका रोमॅँटिक हिरोची भूमिका साकारत आहेत, काय सांगाल आपल्या या अनुभवाबाबत?
- जेव्हा एखादा व्यक्ती चित्रपटात काम करु इच्छित असेल तर त्याचा मानस हा हिरो बनण्याचा असतो. मी देखील अभिनयाची सुरुवात केली तेव्हा माझीपण हिरो बनण्याची इच्छा होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या ४८ वर्षाच्या करिअरमध्ये मला कधी रोमॅँटिक भूमिका मिळाली नाही. मात्र एवढ्या वर्षानंतर मला आता रोमॅँटिक भूमिका मिळाली आहे, जी आजपर्यंत मला मिळाली नाही, तर ही इच्छा तब्बल ४८ वर्षानंतर पूर्ण होत आहे. मला जेव्हा यांनी कहाणी ऐकवली तेव्हा मला त्यांच्या धाडसाचे आश्चर्य वाटले की, हे असा कसा विचार करु शकतात माझ्याबाबतीत की, ज्याने आतापर्यंत फक्त खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि त्याला रोमॅँटिक भूमिका द्यावी. खरं तर हे माझ्यासाठी देखील आवाहन होते, कारण मी पर्सनॅलिटीने, चेहºयाने, हावभावाने तर रोमॅँटिक वाटत नाही. मात्र मी हाच विचार केला यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, तो पुर्णत्वास न्यावा.
* आपण या इंडस्ट्रीत खूपच ज्येष्ठ आहात, तर या शॉर्टफिल्ममध्ये तरुण दिग्दर्शकांसोबत काम करताना कसे वाटले?
- मी नेहमी असा विचार करतो की, अमिताभ बच्चन ७६ वर्षाचे झाले आहेत आणि ते सध्या तरुण दिग्दर्शकांसोबतच काम करत आहेत. त्यांची ही गती खरंच उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच मी त्यांची प्रेरणा घेऊन या तरुणांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही आज या इंडस्ट्रीत काम करताना सुमारे ५० वर्ष झालीत, ते ज्या स्पीडने काम करत आहेत, त्यांना पे्ररित होऊनच मी देखील ठरविले की त्यांच्यासारखेच काम करावे. त्यांच्यासोबत काम करण्याचा खूपच चांगला अनुभव राहिला.
* या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या वयाच्या बरोबरीचे जे कलाकार आहेत, त्यांना काय संधी आहे?
- मला ही जी संधी मिळाली ती माझ्या नशिबाने मिळाली आहे, जी मला आजपर्यंत कधी मिळाली नाही. आम्ही व्हिलन एका इमेजमध्ये बांधले जातो. मात्र त्या इमेजपेक्षा हटके जे मला हे काम मिळाले आहे, माझे अभिनय कौशल्य दाखविण्याचे, ते मला माझ्या नशिबाने मिळाले आहे. मात्र हे प्रत्येकाला मिळत नाही. जे माझे सहकारी खलनायक आहेत, त्यांनाही जर असे काम मिळाले तर ते नशिबानेच मिळेल.
* या इंडस्ट्रीत तुमची जी व्हिलनची इमेज बनली आहे, त्या इमेजला बदलण्याचे काही नियोजन आहे का?
- माझे तर तसे काहीही नियोजन नाहीय. मी तर मजूर व्यक्ती आहे. माझी तर अभिनयाची दुकान उघडली आहे. माझ्याजवळ ग्राहक येतात, त्यांना काय खरेदी करायचेय आहे ते ठरवतिल. माझ्या या अभिनयाच्या दुकानात जो काही खरेदी करण्यासाठी येईल त्याची पुर्तता करण्याचे मी काम करतोय. प्रत्येकाच्या मनात एक सुप्त स्वप्न असते, माझ्याही मनात एक स्वप्न होते एखादी हटके भूमिका मिळावी आणि माझी व्हिलनची इमेज बनली आहे, ती ब्रेक व्हावी. मात्र याने ती इच्छा पूर्ण झाली आहे.
* प्रेक्षक सध्या डिजिटल मीडियाला जास्त पसंत करु लागले आहेत, याबाबतीत काय सांगाल?
- खूपच चांगली गोष्ट आहे. यामुळे बरेच रस्ते उघड झाले आहेत. प्रत्येक जण तर शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, ऋतिक रोशन यांच्यासोबत चित्रपट बनवू शकत नाही, मात्र या डिजिटल माध्यमातून त्यांनाही पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्हणून या माध्यमाचे आम्ही स्वागत करतो.
* ‘मीटू’ मोहिमेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हाहाकार माजवला आहे, जे होत आहे ते चांगले होत आहे की चुकीचे, याबाबत काय सांगाल?
- आपल्या भारतात प्रजातंत्र आहे, कोणालाही तक्रार करण्याचा अधिकार आहे. जर कुणावर अन्याय झाला आहे तर त्याला अधिकार आहे त्याबाबत वाचा फोडण्याचा. मात्र सोबतच कायदा हे म्हणतो की, जो पर्यंत संबंधीतावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी म्हटला जाऊ शकत नाही. आपणास आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्याचसोबत पुरावादेखील द्यावे लागतील. कारण पुराव्याव्यतिरिक्त कायद्याने त्याला शिक्षा होणारच नाही.
* आपण ‘मीटू’ मोहिमेच्या सोबत आहात की विरोधात?
- मी तर या मोहिमेच्या सोबतच आहे. मात्र मी सांगू इच्छितो की, जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीतच करावे. मीडियामध्ये वाच्यता करण्यात काही मिळणार नाही. जर आपल्यावर अन्याय झाला आहे तर कायद्याने आपल्याला न्याय मिळणारच आहे. मात्र जे आरोप केले आहेत त्याचे पुरावेदेखील द्यावे लागलीत. आपला देश असा आहे, याठिकाणी अजमल कसाबलाही त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती, त्याला तर सर्वांनीच गोळ्या झाडताना पाहिले होते. यामुळे आपले म्हणणे मांडण्याची सर्वांना संधी द्यायला हवी.