'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू
By तेजल गावडे | Published: September 24, 2020 06:53 PM2020-09-24T18:53:46+5:302020-09-24T18:55:22+5:30
कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने मुंबईतील इमारत दुर्घटनेवरुन मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. कंगनाने याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेने वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या कारवाईविरोधात कंगना हायकोर्टात धाव घेतली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिकेला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी हायकोर्टाने एक आठवड्याची मुदत दिली आहे.
कंगनाप्रकरणी उत्तर देण्यासाठी बीएमसीच्या वकिलांनी 2 दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, न्यायाधीश कठावडा भडकले, एखाद्याचं घर तोडण्यात आलंय. मग, पावसाळ्याच्या वातावरणात त्या घराला असंच पडीक ठेवता येणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले. मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारल्यानंतर कंगनाच्या डोळ्यातही पाणी आले. याबद्दल कंगनाने ट्विट केले की, 'आदरणीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, यामुळे माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मुंबईच्या जोरदार पावसात माझे घर खरोखरच कोसळले आहे, तुम्ही माझ्या तुटलेल्या घराविषयी एवढ्या काळजीने विचार केला, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मनाला खूप बरे वाटत आहे. मी जे सर्वकाही गमावले ते मिळवून देण्यासाठी धन्यवाद'.
Honourable Justice HC, this brought tears to my eyes, in the lashing rains of Mumbai my house is indeed falling apart, you thought about my broken house with so much compassion and concern means a lot to me,my heart is healed thank you for giving me back all that I had lost 🙏 https://t.co/zB9auZwzjX
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता, भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का 🙏 https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
कंगनाकडून शिवसेनेवर सातत्याने टीका
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. तसेच, मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्यप्त काश्मीर) केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. यावरून कंगना विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडले आहे.
मुंबई पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली असून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई पालिकेवर टीका करत आहे. याआधीही कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी "उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझे घर तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझा गर्व तुटेल," अशी टीका कंगनाने केली होती.