सैफ अली खानला आई-वडिलांकडून मिळाली ही शिकवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:00 AM2019-05-26T06:00:00+5:302019-05-26T06:00:00+5:30
सैफ अली खान नुकताच स्टार प्लस वाहिनीवरील ‘कहां हम, कहां तुम’च्या पहिल्या प्रोमोमध्ये पहायला मिळाला.
स्टार प्लस वाहिनीवर लवकरच ‘कहाँ हम, कहाँ तुम’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकमेकांवर नितांत प्रेम असूनही एकमेकांसाठी वेळ न काढता येणाऱ्या एका दाम्पत्याची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. यात टीव्हीवरील नामवंत कलाकार दीपिका कक्कर आणि करण व्ही. ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘कहाँ हम, कहाँ तुम’ या मालिकेत दीपिका टीव्हीवरील अभिनेत्रीची, तर करण हृदयरोगतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहेत. संदीप सिकंद निर्मित या मालिकेची आणि त्यातील व्यक्तिरेखांची ओळख बॉलिवूडचा नबाब सैफ अली खान एका खास प्रोमोमध्ये करून देणार आहे.
सैफ अलीचे आई व वडील हे दोन भिन्न क्षेत्रांतील असल्याने या मालिकेसाठी सूत्रधाराची भूमिका पार पाडण्यासाठी सैफची झालेली ही निवड कथा-संकल्पनेला सर्जनशील न्याय देणारी ठरते.
सैफ अली खान म्हणाला, “अगदी लहान वयातच नात्यात उद्भवणाऱ्या मतभिन्नतेचा आदर करण्यास मी शिकलो. याचे कारण माझे वडील हे क्रिकेटपटू होते आणि माझी आई ही चित्रपटातील अभिनेत्री होती. त्यांचे व्यावसायिक विश्व वेगळे होते. त्यांच्या अतिशय व्यग्र जीवनातही त्यांनी आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल टिकवून धरला होता. त्यांनी आयुष्यभर एकमेकांचा, त्यांच्या व्यवसायांचा आदर केला आणि एकमेकाला सांभाळून घेतले. त्यामुळे त्यांचे जीवन हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. म्हणूनच या मालिकेचे कथानक मला सहज पटण्यासारखे आहे कारण यातील दीपिका आणि करणचे व्यवसाय माझ्या पालकांसारखेच अगदी भिन्न आहेत. त्यामुळेच मी या मालिकेशी लगेचच जोडला गेलो.”
‘कहाँ हम, कहाँ तुम’ लवकरच फक्त ‘स्टार प्लस’वर प्रसारीत होणार आहे.