Naatu Naatu: ऑस्कर जिंकल्यानंतर जगभरात 'नाटू नाटू'चा बोलबाला!, इंटरनेट जगतात बनवला मोठा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:25 PM2023-03-15T19:25:28+5:302023-03-15T19:26:15+5:30
Naatu Naatu: 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर हे गाणं जगभरात चर्चेत आहे.
९५व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेमाने इतिहास रचला आहे. RRR चित्रपटाच्या 'नाटू-नाटू'ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आता या गाण्याशी संबंधित एक लेटेस्ट रिपोर्ट समोर आला आहे. ऑस्कर अवॉर्ड जिंकल्यानंतर गुगलवर 'नाटू नाटू' सर्च १,१०५ टक्क्यांनी वाढले आहे.
'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर जगभरातील सिनेप्रेमी 'नाटू नाटू' हे गाणे गुगलवर सर्च करत आहेत. मार्चमध्ये रिलीज झालेल्या या गाण्याला टिक-टॉकवर ५२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सोहळ्यात काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणे गायले. त्यांच्या गायनाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला 'स्टँडिंग ओव्हेशन'देखील मिळाले.
'आरआरआर' चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. देशासह विदेशातदेखील या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. यातील 'नाटू नाटू' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. हे गाणे चंद्रबोसने लिहिले आहे तर एमएस किरावणीने संगीतबद्ध केले आहे. 'नाटू नाटू' हे गाणे हिंदीत 'नाचो नाचो', तमीळमध्ये 'नट्टू कूथु' आणि कन्नडमध्ये 'हल्ली नातु' म्हणून रिलीज करण्यात आले आहे.
'ऑस्कर २०२३'मध्ये एस.एस राजामौलींच्या आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने इतिहास घडवला आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. या गाण्यावरील प्रेम रक्षित यांच्या नृत्यदिग्दर्शनालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.