Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:15 IST2022-09-16T11:13:07+5:302022-09-16T11:15:44+5:30
Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता...

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन
साऊथ सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) सध्या जाम चर्चेत आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात त्याने साकारलेल्या दमदार भूमिकेचं जबरदस्त कौतुक झालं. नुकताच नागार्जुन करण जोहरच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला होता. यावेळी तो ‘ब्रह्मास्त्र’बद्दल भरभरून बोलला होता. आता त्याने मुलगा नागा चैतन्यच्या घटस्फोटावरही प्रतिक्रिया दिली आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) व अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता. पहिल्यांदाच त्याने यावर चुप्पी सोडली आहे.
काय म्हणाला नागार्जुन?
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर बोलला. ‘माझा मुलगा आता आनंदी आहे आणि सध्या फक्त हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. पण आता ते घडलंय. आता सतत त्याच त्या विषयावर बोलण्यात अर्थ नाही. आम्ही आता त्यातून बाहेर पडलो आहोत. माझा मुलगा आनंदात आहेत आणि त्याला आनंदी बघून मी आनंदात आहेत, असं नागार्जुन म्हणाला.
घटस्फोटानंतर सामंथासोबतचं नातं कसं आहे? यावरही नागार्जुन बोलला. ‘आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. जे काही घडलं त्यानंतरही तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, याकडे माझं थोड फार लक्ष असतंच. तिच्याबद्दल माझ्या मनात नेहमी आदर असेल. बस्स इतकंच. आम्हाला जे काही बोलायचं होतं, ते आम्ही बोललो. याशिवाय जे काही छापून आलं, ज्या काही बातम्या पेरल्या गेल्यात, त्यात काहीही तथ्य नाही. खरं तर मी त्या अफवांना कंटाळलो आहे. माझे तीन सिनेमे रिलीज झालेत आणि दरवेळी मला याबद्दल विचारलं जातंय’, असं तो म्हणाला.
यावर्षीच्या सुरूवातीला नागार्जुनने चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया सामंथा व नागा चैतन्यबद्दल मी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन ज्या काही बातम्या दाखवत आहेत, त्या सगळ्या बकवास आहेत. मी मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की, कृपा करून अफवांना बातम्या करून नका. अफवा नाही, बातम्या द्या,’अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.