पत्नी नीलकांतीमुळेच नाना पाटेकर पूर्ण करू शकले अभिनेता बनण्याचे स्वप्न, ‘त्या’ काळात दिला मोठा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 11:20 AM2021-01-01T11:20:22+5:302021-01-01T11:22:04+5:30
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस. हिंदी, मराठी, तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटात दमदार भूमिका करणारे नाना यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण अर्थातच हे सगळे त्यांना सहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. पर्सनल लाईफमध्ये त्यांनी अनेक खस्ता खाल्या. दशकांपासून नाना इंडस्ट्रीत आहेत. पण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. विशेषत: त्यांची लव्हस्टोरी...
होय, आम्ही बोलतोय ते नाना आणि त्यांच्या पत्नी नीलकांती यांच्याबद्दल. नाना आणि नीलकांती यांचा प्रेमविवाह. कॉलेजच्या दिवसांत नाना व नीलकांती यांची ओळख झाली. पुढे प्रेम आणि नंतर लग्न. तर आज हीच प्रेमकहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नानांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या 13 वर्षी नानांच्या आयुष्यात एक वादळ आले आणि या वादळाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकले. होय, एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले होते. नानांच्या वडीलांचा टेक्सटाइल पेंटिंगचा एक छोटासा व्यवसाय होता. नाना 13 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या एका जवळच्या नातेवाईकाने त्यांची सर्व संपत्ती बळकावली आणि नानाचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तो त्यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता. इतका मोठा की, वयाच्या 13 वषापार्सूनच नानांना काम करावे लागले. शाळा संपल्यावर नाना 8 किलोमीटर दूर चुनाभट्टीला जाऊन सिनेमांचे पोस्टर पेंट करण्याचे काम करायचे. या पैशातून त्यांना दोन वेळचे जेवण मिळत असे. त्यावेळी त्यांना 35 रुपये महिना मिळायचा.
अपार कष्ट करून नाना शिकले. कॉलेजमध्ये असतानाही सकाळी कॉलेज आणि यानंतर नाना एका अॅड एजन्सीत काम करायचे. याचदरम्यान नीलकांतीशी त्यांची ओळख झाली होती. पुढे भेटीगाठी वाढल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नीलकांती त्यावेळी एका बँकेत नोकरीला होत्या. पण अभिनयात त्यांना रूची होती आणि रंगभूमीवर त्यांनी कामही केले होते. अभिनयाची आवड हा एकच धागा नाना व नीलकांती यांना पती-पत्नीच्या नात्यात बांधण्यासाठी पुरेसा ठरला.
लग्न झाले त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्नाच्यावेळी नीलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत होते. नाना आणि नीलकांती यांच्या लग्न फक्त 750 रुपयांत झाले होते. 24 रुपये शिल्लक राहिले होते. यातून त्यांनी पाहुण्यांसाठी एका छोट्या पार्टीचे आयोजन केले होते.
नानांच्या करियरमध्ये नीलकांती नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना पाटेकर यांना अभिनय क्षेत्रात यश मिळवता आले. नाना यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते, ‘लग्नानंतर अॅडव्हरटायजिंग किंवा अॅक्टिंग यापैकी एक निवडण्याची वेळ आली होती. मी अॅक्टिंग निवडले. पण प्रत्येक शोचे फक्त 75 रूपये मिळणार होते. अशावेळी नीलकांतीने मला प्रोत्साहन दिले. पैशाची अजिबात चिंता करू नकोस. अॅक्टिंग तुझा श्वास आहे, तेव्हा तेच कर, असे ती मला म्हणाली. तिच्या या खंबीर पाठींब्यामुळेच आज मी येथे आहे.’
आज नीलकांती या सुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. अभिनेत्री आणि निर्माती अशी त्यांची ओळख आहेत. नीलकांती यांनी ‘आत्मविश्वास’या सचिन पिळगावकर दिग्दर्शित सिनेमात काम केले होते. यानंतर 28 वर्षांनी नीलिमा लोणारी दिग्दर्शित ‘बर्नी’ स्या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केले होते.
नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून त्याला अनेकवेळा नानांसोबत पाहायला मिळते. नाना आणि नीलकांती गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.