नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाचे झाले होते निधन, कधीच विसरू शकले नाही हे दुःख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 03:28 PM2021-01-12T15:28:18+5:302021-01-12T15:29:20+5:30
मल्हारच्या आधी त्यांना एक मुलगा होता. पण जन्मानंतर काहीच महिन्यांमध्ये त्याचे निधन झाले.
नाना पाटेकर यांनी आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी वेलकम, परिंदा, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्राचा भाग असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. नाना यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निलकांती यांच्यासोबत लग्न केले. निलकांती या देखील एक अभिनेत्री आहेत. नाना पाटेकर यांच्या लग्नानंतर एकच वर्षांनी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या दुःखातून ते बाहेर पण आले नव्हते. त्यात दीड वर्षांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. या दुःखातून ते कधीच सावरू शकले नाहीत.
नाना पाटेकर यांच्या मल्हार या मुलाविषयी सगळ्यांनाच माहीत आहे. मल्हारच्या आधी त्यांना एक मुलगा होता. पण जन्मानंतर काहीच महिन्यांमध्ये त्याचे निधन झाले. नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा जन्मला तेव्हापासूनच त्याची तब्येत नाजूक होती.
नाना आणि निलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. लग्न झाले त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्नाच्यावेळी निलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यावेळी त्या बँकेत नोकरीला असून त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत होते.
नानांच्या करियरमध्ये निलकांती नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना पाटेकर यांना अभिनय क्षेत्रात यश मिळवता आले.