'त्या' व्हायरल व्हिडिओबाबत नानांनी मागितली माफी, म्हणाले, "मी कोणालाही फोटोसाठी नकार देत नाही, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 09:06 AM2023-11-16T09:06:29+5:302023-11-16T09:07:17+5:30
व्हायरल व्हिडिओवर नानांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो मुलगा कोण आहे हे..."
मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर सध्या चर्चेत आले आहेत. नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सेल्फी घेणाऱ्या चाहत्याच्या डोक्यात नाना जोरात फटका मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नानांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबाबत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'जर्नी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा तो व्हिडिओ असून सिनेमातील एक सीन असल्याचं म्हटलं होतं. आता नाना पाटेकरांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
नानांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याबरोबरच अनावधानाने ती चूक झाल्याचंही म्हटलं आहे. "मी एका मुलाच्या डोक्यात मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमच्या चित्रपटातील सीनचा तो भाग आहे. त्या व्हिडिओत मी टोपी घातली आहे. एक व्यक्ती मला पाठीमागून टोपी विकायची आहे का? असं विचारतो. तो जेव्हा पुढे येतो तेव्हा मी त्याला मारतो आणि हे बघ ही बोलण्याची पद्धत नाही, नीट वाग असं म्हणतो...त्यानंतर तो पळून जातो...असा तो सीन होता," असं नाना म्हणाले.
त्यानंतर नाना म्हणाले, "आम्ही एक रिहर्सल केली होती. पण, दिग्दर्शक म्हणाले आणखी एकदा करू. आम्ही रिहर्सल सुरूच करणार होतो. तेवढ्यातच व्हिडिओत दिसणारा मुलगा सीनमध्ये आला. तो मुलगा कोण आहे, हे मला माहीत नव्हतं. तो मुलगा सीनमधीलच आहे, असं मला वाटलं. त्यामुळे मी सीनप्रमाणे त्याच्या डोक्यात मारलं. पण, मला नंतर कळलं की तो दुसराच कोणीतरी मुलगा होता. पण, जोपर्यंत मी त्याला बोलवेन तो पळून गेला होता. कदाचित त्याच्या मित्राने तो व्हिडिओ शूट केला असावा. "
"मी आजपर्यंत कधीच कोणालाही फोटोसाठी नाही म्हटलेलं नाही. वाराणसीतील त्या घाटात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे हे झालं. पण, हे अनावधानाने झालं आहे. तो मुलगा कुठून आला हे मला माहीत नव्हतं. पण, तुमचा गैगसमज झाला असेल, तर मला माफ करा. मी कधीच असं कोणाला मारत नाही. आजपर्यंत मी असं कधी केलेलंही नाही. काशीमधील सगळेच लोक मला खूप प्रेम देतात. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर कधीच असं करणार नाही. आम्ही त्या मुलाला खूप शोधलं पण तो पळून गेला होता. तो भीतीपोटी पळून गेला असेल. पण, मी त्याचीही माफी मागायला तयार आहे," असं म्हणत नानांनी या व्हिडिओबाबत जाहीर माफी मागितली आहे.