बॉलिवूड सोडून तेलगू सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:19 AM2019-03-30T11:19:15+5:302019-03-30T11:34:02+5:30
नाना पाटेकर तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मीटू मोहिमे अंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र त्यानंतर 'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नानांसोबत काम करण्यास नकार दिला होता. या आरोपांनंतर नाना हिंदी चित्रपटात दिसले नाहीत. परंतु, आता सूत्रांकडून समजते आहे की लवकरच ते तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या 'नन्ना नेनू' या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाना पाटेकर योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. या चित्रपटाची बोलणी सध्या नाना पाटेकर यांच्यासोबत सुरू असून अद्याप या चित्रपटाचे कथानक गुलदस्त्यात आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले. आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावरील या आरोपांमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर अनेकांना विशेषतः नाना यांच्या फॅन्सना यात तथ्य वाटत नाही.