नाना ते माधुरी अन् तरडे ते मंजुळे; २०२४मध्ये रंगणार या २४ चित्रपटांची चर्चा

By संजय घावरे | Published: January 2, 2024 11:38 PM2024-01-02T23:38:15+5:302024-01-02T23:39:56+5:30

२४ चित्रपट रसिकांना मोहिनी घालणार आहेत. यांच्या जोडीला इतरही सिनेमे आहेत.

Nana to Madhuri and Tarde to Manjule; Discussion of these 24 films to be released in 2024 | नाना ते माधुरी अन् तरडे ते मंजुळे; २०२४मध्ये रंगणार या २४ चित्रपटांची चर्चा

नाना ते माधुरी अन् तरडे ते मंजुळे; २०२४मध्ये रंगणार या २४ चित्रपटांची चर्चा

मुंबई - २०२४ सुरू झाल्यापासून रसिकांना यंदा प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची उत्सुकता आहे. मागच्या वर्षी ९१ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. यंदा एक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टी चित्रपटांचे शतक ठोकण्यासाठी सज्ज झाली आहे. तूर्तास २०२४ मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांपैकी २४ चित्रपट रसिकांना मोहिनी घालणार आहेत. यांच्या जोडीला इतरही सिनेमे आहेत.

नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांची भूमिका असलेल्या 'ओले आले' या चित्रपटासोबत माधुरी दीक्षितचा 'पंचक' या शुक्रवारी रिलीज होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारलेल्या 'सत्यशोधक'मध्ये संदीप कुलकर्णी ज्योतिबांच्या, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. सोनाली कुलकर्णी 'मोगलमर्दिनी ताराराणी' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या बहुचर्चित 'निरवधी'मध्ये सुबोध भावे, उपेंद्र लिमये, गौरी इंगवले या मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'महापरिनिर्वाण'मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता आहे. स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे यांच्या भूमिका असलेल्या 'जिलबी'चे दिग्दर्शन नितीन कांबळेने केले आहे. स्वप्निल जोशी अभिनीत 'नाच गं घुमा' हा चित्रपटही लक्ष वेधणार आहे. दिग्दर्शक मकरंद मानेच्या 'खिल्लार'च्या पोस्टरवरील बैलांची खिल्लारी जोडी हा चित्रपट बैलगाडा शर्यतीवर असल्याचे संकेत देते. 'गोदावरी' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा निखिल महाजन 'रावसाहेब' बनवत आहे. विक्रम गोखलेंचा 'सूर लागू दे' हा शेवटचा चित्रपटही यंदा येणार आहे. 'इलू इलू' पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा मजेशीर चित्रपट आहे. इतिहासासोबत अध्यात्माचा अभ्यास असणारा दिग्पाल लांजेकर संत मुक्ताबाईंवर 'मुक्ताई' चित्रपट बनवत आहे.

प्रवीण तरडे 'धर्मवीर २' बनवत असून, यात प्रसाद ओक पुन्हा आनंद दिघेंच्या रूपात दिसणार आहे. भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्यावर ‘खाशाबा’ चित्रपट बनवण्याचे आव्हान नागराज मंजुळेने स्वीकारले आहे. सई ताम्हणकरला 'श्रीदेवी प्रसन्न' झाली असून, यात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आहे. 'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकर 'कलावती' बनली आहे. 'पठ्ठे बाबुराव'मध्ये अमृतासोबत प्रसाद ओक दिसणार आहे. सुबोध भावेने 'मानापमान'च्या रूपात पुन्हा एक नवे शिवधनुष्य उचलले आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' धर्मवीर संभाजीमहाराजांच्या चरित्रपटात शीर्षक भूमिकेतील कलाकाराची उत्सुकता आहे. मुहर्तापासून गाजावाजा झालेल्या महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या 'वीर दौडले सात'मध्ये सात शूरवीरांची कथा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा 'वीर मुरारबाजी... पुरंदरची युद्धगाथा’मध्ये रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. विजय राणे दिग्दर्शित 'सिंहासनाधिश्वर' हा ऐतिहासिकपट शिवराज्याभिषेकावर आधारलेला आहे. नाशिक नजीकच्या 'रामशेज' किल्ल्याची लढाई दाखवणाऱ्या 'रामशेज' चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा आहे.

या चित्रपटांचीही उत्सुकता...

शहाजी पाटील दिग्दर्शित 'बाजींद'मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता हंसराज जगताप आणि पूजा बिरारीची जोडी आहे. सिम्मी जोसेफ, रॉबिन वर्गिस दिग्दर्शित 'रील स्टार' चित्रपटाद्वारे नागराज मंजुळेंचा भाऊ भूषण मंजुळे मुख्य भूमिकेत आहे. लेखक-दिग्दर्शक निशांत धापसेंच्या 'जयभीम पँथर'चीही उत्सुकता आहे. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचा '८ दोन ७५' बऱ्याच महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. दिग्दर्शक मोहसीन खानच्या 'डिलिव्हरी बॉय'मध्ये प्रथमेश परब व पृथ्वीक प्रतापची जोडी आहे. पुष्कर जोगने दिग्दर्शित केलेल्या 'मुसाफिराना'मध्ये पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहे. याखेरीज 'कन्नी', 'अलिबाबा आणि चाळीसीतले चोर', 'लग्न कल्लोळ', 'फौज', 'नीलावती', 'माय लेक' असे बरेच चित्रपट यंदा येणार आहेत.

Web Title: Nana to Madhuri and Tarde to Manjule; Discussion of these 24 films to be released in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.