Death Anniversary : नर्गिस यांच्या लग्नाची बातमी ऐकून ढसाढसा रडले होते राज कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 06:00 AM2019-05-03T06:00:00+5:302019-05-03T06:00:02+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री नर्गिस यांची आज (3 मे) पुण्यतिथी. १९८१ साली आजच्याच दिवशी नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री नर्गिस यांची आज (3 मे) पुण्यतिथी. १९८१ साली आजच्याच दिवशी नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला.
१ जून १९२९ साली कलकत्त्यात जन्मलेली ही प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे, जद्दनबाईसारख्या गाजलेल्या गायिकेची मुलगी. उत्तमचंद मोहनचंद तिचे वडील. नर्गिस यांचे वडिल पेशाने डॉक्टर होते. पण आई जद्दनबाई यांचे मात्र हिंदी सिनेसृष्टीशी जिव्हाळ्याचे संबंध होते. खरे तर नर्गिस यांनाही वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचे होते. पण आईमुळे नर्गिस फातिमा रशीद या नावाने वयाच्या चौथ्या त्या वर्षी कॅमे-यासमोर उभ्या राहिल्या. पुढे मेहबुब खान यांनी फातिमा नावाच्या या मुलीचे नर्गिस असे नामकरण केले.
नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. पण त्याआधी राज कपूर सारखे अजरामर व्यक्तिमत्त्व त्यांच्या आयुष्यात आले. सलग १८ चित्रपटांत एकत्र काम करणा-या नर्गिस व राज या जोडीने पडदा तर गाजवलाच. पण एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
‘बरसात’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हे दोघे आणखीच जवळ आलेत. असे म्हणतात की, नर्गिस यांना पाहताच राज कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते.
राज कपूर विवाहित होते. पण नर्गिसच्या प्रेमात ते इतके वेडे झालेत की, त्यांनी नर्गिस यांना लग्नाचे वचन दिले. त्यांच्या या शब्दांवर विश्वास ठेवून नर्गिस तब्बल ९ वर्षे राज कपूर यांची प्रतीक्षा करत राहिल्या. पण राज कपूर पत्नी व मुलांना सोडून आपल्यासोबत लग्न करणार नाहीत, याची खात्री पटली आणि नर्गिस यांनी स्वत:हून या नात्याचा गुंता सोडवला व त्या या नात्यातून बाहेर पडल्या.
पुढे सुनील दत्त नर्गिस यांचे लग्न झाले. नर्गिसच्या लग्नाची बातमी ऐकून राज कपूर ढसाढसा रडले होते. मधु जैन यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
नर्गिस यांनी आपल्याला धोका दिला, असे राज कपूर यांना वाटत होते. १९८६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, राज कपूर यांनी तसे बोलून दाखवले होते. ‘मदर इंडिया’ साईन करतेवेळी नर्गिसने मला धोका दिला होता, असे ते या मुलाखतीत म्हणाले होते.
३ मे १९८१ रोजी नर्गिस यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत राज कपूर सहभागी झाले होते. पण या अंत्ययात्रेत राज कपूर सामान्य लोकांसोबत सर्वांच्या मागे होते. अनेकांनी त्यांना नर्गिस यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला. पण राज कपूर यांनी कुणाचेच ऐकले नाही.