"फिल्मफेअर ट्रॉफी बाथरुमच्या दरवाज्यावर..." नसीरुद्दीन शहांचं अवॉर्ड्सबद्दल वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:37 AM2023-06-06T11:37:44+5:302023-06-06T11:45:08+5:30
नसीरुद्दीन शहांनी फार्महाऊसमध्ये बाथरुमच्या दरवाज्यावर लावल्या फिल्मफेअर ट्रॉफी? काय म्हणाले वाचा
अभिनेते नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) म्हणजे अभिनयाचे विद्यापीठच. 'मासूम','अ वेनस्डे','इश्किया' सारख्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं. पण प्रोफेशनल आयुष्य वगळता ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात असे काही विधानं करतात ज्यामुळे ते सतत चर्चेत असतात. आता नुकतंच त्यांनी फिल्मफेअर ट्रॉफीने बाथरुमच्या दरवाज्याचं हँडल बनवल्याचा खुलासा केला आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शहा यांनी अनेक मजेदार किस्से शेअर केले. फिल्मफेअर सारख्या अवॉर्ड्सना जास्त महत्व देत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, "माझ्यासाठी या ट्रॉफींचं काहीच महत्व नाही. जेव्हा पहिल्यांदा ट्रॉफी मिळाली तेव्हा मी खूप खूश झालो होतो. यानंतर एकामागोमाग एक मला अवॉर्ड मिळत गेले. पण तेव्हा मला लक्षात आलं हे अवॉर्ड लॉबिंगचा परिणाम आहे. हे तुम्हाला तुमच्या मेरिटमुळे मिळत नाहीएत."
ते पुढे म्हणाले,"मग मी हे सगळे ट्रॉफी कुठेतरी ठेवून दिल्या. जेव्हा मला पद्मश्री, पद्मविभूषण मिळाला तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण आली.त्यांना नेहमी वाटायचं की मी फालतू काम करतोय. पद्म पुरस्कार मिळाले त्याचा मला आनंद झाला. पण हे जे स्पर्धात्मक अवॉर्ड जे असतात ते मला अजिबात आवडत नाहीत. ज्या कलाकाराने वर्षभर मेहनतीने जीव ओवाळून काम केलं आहे तो सगळ्यात चांगला अभिनेता असायला हवा. त्यात स्पर्धा नको. मला अशा अवॉर्ड्सबाबत अभिमान नाही वाटत. शेवटचे दोन अवॉर्ड घ्यायलाही मी गेलो नाही. म्हणूनच मी फार्महाऊस बनवल्यावर बाथरुमच्या दरवाज्याला दोन अवॉर्ड लावले. त्यामुळे जो दरवाजा उघडेल त्याला दोन अवॉर्ड मिळतील कारण दोन्ही हातांनी दरवाजा उघडावा लागतो."