ते तिथे असतातचं कुठे? एफटीआयआय चेअरमन अनुपम खेर यांना नसीरूद्दीन शहा यांचा असाही टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:25 PM2018-08-30T18:25:42+5:302018-08-30T18:26:28+5:30
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची गतवर्षी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती झाली. पण आता या पदाच्या गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची गतवर्षी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती झाली. पण आता या पदाच्या गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. ही टीका करणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून अनुपम यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम करणारे अभिनेते नसीरूद्दीन शहा आहेत. एफटीआयआयमधील अनुपम खेर यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी नेमके बोट ठेवले आहे.
अलीकडे एका इव्हेंटमध्ये बोलताना नसीरूद्दीन शहा यांनी अनुपम यांच्या एफटीआयआयमधील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
‘ते तिथे (एफटीआयआय)असतातचं कुठे? ते तिथे कधी कधी उगवतात, अशास्थितीत एफटीआयआयमधील त्यांच्या कामावर मी काय बोलणार, मला नाही वाटत की, ते दोनपेक्षा अधिकवेळा तिथे गेले असतील. मी एफटीआयआयमध्ये अनेकदा लेक्चरसाठी जातो. यादरम्यान अनुपम फार क्वचित येथे येतात, असे मला कळले. त्यांनी अधिकाधिक वेळ या संस्थेला दिला तरचं आपल्याला त्यांचे काम पाहायला मिळेल आणि तेव्हाच मी त्यांच्या कामाबद्दल काही प्रतिक्रिया देऊ शकेल,’ असे नसीरूद्दीन शहा उपरोधिकपणे म्हणाले.
आपल्याचं एका इंडस्ट्रीतील मित्राकडून झालेल्या या आरोपावर अनुपम खेर काय उत्तर देतात, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे. नसीरूद्दीन शहा आणि अनुपम खेर यांनी १० पेक्षा अधिक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘ अ वेन्सडे’, ‘कर्मा’ अशा अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे. नसीर व अनुपम हे दोघेही नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे विद्यार्थी आहेत.
अनुपम खेर यांच्याआधी एफटीआयआयच्या चेअरमनपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून सरकारने गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या चेअरमनदावर कायम ठेवले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली होती.