नाझी जर्मनीत हेच व्हायचं...! नसीरूद्दीन शाह यांनी साधला सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:34 PM2021-09-14T12:34:30+5:302021-09-14T12:37:24+5:30
आपल्या अभिनयासह रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वाचा काय म्हणाले शाह?
आपल्या अभिनयासह रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टी ‘इस्लामोफोबिया’ने ग्रासलेली आहे, असं म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारची तुलना अप्रत्यक्षपणे नाझी जर्मनीशी करत, त्यांनी सरकारच्या कामावर जोरदार हल्ला चढवला आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शहा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ‘भारतीय चित्रपटसृृष्टीतील निर्माता-दिग्दर्शकांवर सध्या सरकारला हवे तसे सिनेमे बनवण्याचा दबाव टाकला जातोय. सरकारच्या कामाचा प्रचार करणारे, सरकारचा प्रोपोगंडा करणा-या सिनेमांसाठीचा दबाव वाढतो आहे. यासाठी फंडिंग दिलं जातंय. थेट प्रचार करणारे सिनेमे असतील तर त्यांना क्लीन चीट देण्याचं आश्वासनही सरकारकडून दिलं जातंय. एकेकाळी नाझी जर्मनीमध्ये असं होत होतं. उत्तम सिनेनिर्मिती करणा-या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमे बनवण्यासाठी सांगितलं जायचं. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नाही. पण सध्या ज्या प्रकारचे बिग बजेट सिनेमे बनत आहेत, त्यावरून अंदाज येऊ शकतो,’ असं ते म्हणाले.
मला नावं बदलण्याचा सल्ला दिला गेला होता...
फिल्म इंडस्ट्रीत मुस्लिम या नात्याने मला कधीही भेदभाव सहन करावा लागला नाही. पण हो, करिअरच्या सुरूवातीला मला माझं नाव बदलण्याचा सल्ला दिला गेला होता. या इंडस्ट्रीत एकच देव आहे आणि तो म्हणजे पैसा. तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीमध्ये तिन्ही खानांचे राज्य आहे. त्यांना कोणी आव्हान देऊ शकत नाही आणि आजची ते रिजल्ट देत आहेत, असंही ते म्हणाले.
तालिबानचं समर्थन करणा-या वक्तव्यावर केला खुलासा
काही दिवसांपूर्वी नसीरूद्दीन शाह यांनी तालिबानचं समर्थन करणा-या भारतीय मुस्लिमांना फटकारलं होतं. अफगाणिस्तानावर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काही भारतीय मुस्लिमांना आनंद होत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून नसीर ट्रोलही झाले होते. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी त्या लोकांबद्दल बोललो होतो, ज्यांनी जाहीरपणे तालिबानला समर्थन करणारे स्टेटमेंट दिलं होतं. तालिबानचा इतिहास खूप वाईट आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.