Naseeruddin Shah : -म्हणून साऊथचे सिनेमे लोकांना आवडतात..., नसीरूद्दीन शाह यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:23 PM2023-03-01T12:23:19+5:302023-03-01T12:25:54+5:30
Naseeruddin Shah : अलीकडच्या काळात साऊथ सिनेमांनी बाॅलिवूडला घाम फोडला आहे. साऊथचे सिनेमे कोट्यवधीची कमाई करत असताना बॉलिवूडमध्ये फ्लॉपची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नसीर यांनी स्पष्ट मत मांडलं.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) त्यांच्या अभिनयासोबतच परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक विषयांवर स्पष्टपणे मत मांडणाऱ्या नसीरूद्दीन शाह यांनी आता साऊथ व बॉलिवूड सिनेमांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
अलीकडच्या काळात साऊथ सिनेमांनी बाॅलिवूडला घाम फोडला आहे. साऊथचे सिनेमे कोट्यवधीची कमाई करत असताना बॉलिवूडमध्ये फ्लॉपची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नसीर यांनी एका ताज्या मुलाखतीत स्पष्ट मत मांडलं.
काय म्हणाले नसीरूद्दीन शाह..?
तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू चित्रपटही कल्पनारम्य असतात. भलेही त्यात काही लाॅजिक नसेल. त्यांची टेस्ट कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. पण त्यांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं. साऊथचे चित्रपट ओरिजनल असतात. त्यामुळेच ते वेगळे ठरतात. सगळ्यांना आवडतात. मला वाटतं, साऊथ सिनेमांवर हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त मेहनत घेतली जाते आणि त्याचा परिणाम चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्पष्टपणे दिसतो, असं नसीरूद्दीन इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
बॉलिवूड चित्रपटांत नेहमीच...
यादरम्यान त्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर टीकाही केली. ते म्हणाले की, 'हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच धर्मांची खिल्ली उडवली जाते. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे की, मुस्लिम व्यक्ती मित्राची भूमिका साकारते आणि चित्रपटाच्या शेवटी मरतो. शीख आणि पारशी लोक कायम यांच्या चित्रपटात विनोदाचे पात्र ठरतात. इतरांच्या दु:खावर हसणं जणू राष्ट्रीय परंपरा बनली आहे. आपली खिल्ली उडवल्यावर आपल्याला वाईट वाटतं. पण इतरांची खिल्ली उडवताना आपण अजिबात विचार करत नाही...
येत्या 3 मार्चला नसीरूद्दीन शाह यांची 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये नसीर अकबरची भूमिका साकारणार आहेत. तसेच, धर्मेंद्र, अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा, राहुल बोस यांच्याही मुख्य भूमिका आहेत.