'सूर्या' तळपला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'साउथ सुपरस्टार'चा अजय देवगणसोबत 'रुपेरी' सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:24 PM2022-07-22T18:24:55+5:302022-07-22T18:25:38+5:30
68th National Film Awards :साऊथचा स्टार सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहिर करण्यात आले. यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने आपली मोहोर उमटविली आहे. त्याच्यासोबत साऊथ सुपरस्टार सूर्या यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. अजय देवगणला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ तर सूर्या(Suriya)ला ‘सुरूराई पोटू’ (Soorarai Pottru) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.
साऊथचा स्टार सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच या चित्रपटातील त्याची सहकलाकार तमीळ अभिनेत्री अपर्णा बालामुरली हिला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. ‘सुरूराई पोटू’चा अर्थ आहे शूरतेची प्रशंसा. एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘सुरूराई पोटू’ चित्रपटाला देश-विदेशात भरभरून दाद मिळाली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर पाहायला मिळेल.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्या वर्षी पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'शामची आई' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला होता.