#MeToo: विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लावलेल्या आरोपांना 'तारा'फेम नवनीत निशानने दिला दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:52 PM2018-10-09T17:52:12+5:302018-10-09T18:01:34+5:30
आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादात आता तारा मालिकेतील अभिनेत्री नवनीत निशानने देखील उडी घेतली आहे.
टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादात आता तारा मालिकेतील अभिनेत्री नवनीत निशानने देखील उडी घेतली आहे. नवनीत निशानने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आलोक नाथ यांच्या तिने कानशीलात वाजवले असल्याचे म्हटले आहे. तिने या मुलाखतीत सांगितले की, विनिताला झालेल्या वेदना मी समजू शकते. मी त्याच्या चार वर्षांच्या जाचाला कंटाळून त्याच्या कानफटात लगावली होती. त्यानंतर माझ्या हातून मालिका गेली. त्या माणसाने माझी मीडियात बदनामी केली. मी माझा लढा दिला. आज लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढा दिला जात आहे याचा मला आनंद आहे.
विनिता नंदा यांच्या आरोपानंतर ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत आलोक नाथ यांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही मला का विचारता? मला विचारण्यापेक्षा आरोप लावणाऱ्या व्यक्तिलाच विचारा ना? महिलेने म्हटले की ते ब्रह्म वाक्य आहे ना? तेच सत्य आहे. माझी बाजू जाणून तुम्ही काय करणार? तुम्हाला जे काही लिहायचे ते लिहा. शेवटी मी काहीही सांगितले तरी माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? तिने (विनता नंदा)जे काही सांगितले, ते तिची हिन मानसिकता दर्शवते. माझ्यावर आरोप तर लागलेत, पण काही दिवसांतचं सगळे काही स्पष्ट होईल,’असे आलोक नाथ म्हणाले. तुम्ही विनता नंदा यांनी लावलेले सगळे आरोप फेटाळत आहात का? असे विचारले असता, ‘मी ना आरोप फेटाळतो आहे; ना ते मान्य करतो आहे. बलात्कार तर झाला असेल. निश्चितपणे झाला असेल. पण तो मी नाही, दुस-या कुणी केला असेल़. मला यापेक्षा अधिक काहीही बोलायचे नाही. आता हे प्रकरण बाहेर आलेच आहे तर दूरपर्यंत जाईल,’असेही आलोक नाथ म्हणाले.