बस्स..आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; शेअर केलं लांबलचक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:25 PM2023-03-06T13:25:29+5:302023-03-06T13:31:53+5:30
नवाजुद्दीनने लांबलचक पोस्ट शेअर करत सर्व आरोपांवर भाष्य केलं आहे
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याची पत्नी आलियाने (Aliya) त्याच्यावर गंभीर आरोप केलेत.अनेक व्हिडिओ बनवत तिने मुलांची आणि तिची काय परिस्थिती झाली आहे हे दाखवले. या सर्व प्रकरणात नवाज मात्र शांत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला आजारी आईला भेटू न दिल्याचा व्हिडिओ चर्चेत होता. मात्र आता त्याचा बांध सुटला आहे आणि त्याने सोशल मीडियावर एक लांबलचक पत्र पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.
नवाजुद्दीनने लिहिले, 'मी शांत राहिलो म्हणून मला सगळ्यांनी मला वाईट ठरवलंय. माझी लहान मुलं हा सगळा तमाशा कुठे वाचू नये हेच माझ्या शांत राहण्यामागचं कारण आहे.केवळ एकच बाजू ऐकून आणि फेरफार केलेले व्हिडिओ बघून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मीडिया आणि अनेक लोक माझ्या होत असलेल्या चारित्र्यहननाची मजा घेत आहेत. मला काही मुद्दे मांडायचे आहेतय
१. सर्वात पहिले तर मी आणि आलिया बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत राहत नाही आहोत, आमचा घटस्फोट झाला आहे. पण मुलांसाठी आम्ही आपसात समजुतीने वागतो.
२. गेल्या ४५ दिवसांपासून माझ्या मुलं भारतात आहेत आणि त्यांचं शिक्षण थांबलं आहे हे कोणाला माहितीए का. मुलांची फार मोठी गैरहजेरी होत असल्याचे मला रोज शाळेचे मेसेज येत आहेत. माझ्या मुलांना ४५ दिवसांपासून बंदिस्त ठेवलंय. त्यांना दुबईतील शाळेत जाण्याची इच्छा आहे.
३. सुरुवातीला आलिया दोन्ही मुलांना दुबईतच सोडून आली होती. मात्र पैशांच्या मागणीसाठी तिने दोन्ही मुलांना नंतर भारतात आणलं. गेल्या २ वर्षांपासून मी तिला दर महिन्याला १० लाख रुपये देतोय. तर दुबईला जाण्यापूर्वी मी तिला दरमहा ५ ते ७ लाख रुपये देत होतो. शिवाय मुलांची शाळेची फिस, मेडिकलचा खर्च, प्रवासाचा खर्च आणि इतर लक्झरीचे पैसे वेगळे देत होतो. तिचं इन्कम व्हावं म्हणून मी तिच्यासाठी मी ३ फिल्मवर कोटी खर्च केले कारण शेवटी ती माझ्या मुलांची आई आहे. मुलांसाठी मी तिला लक्झरी गाड्या दिल्या. पण तिने त्या विकल्या आणि ते पैसे स्वत:वरच उडवले. वर्सोवा येथे मुलांसाठी सी फेसिंग आलिशान घर खरेदी केलं. आलियाला या घराची सहमालकिणही केलं कारण मुलं अजून लहान आहेत. दुबईतही त्यांच्यासाठी एक फ्लॅट खरेदी केला. तिला फक्त पैसे हवेत आणि म्हणूनच तिने माझ्यावर, माझ्या आईवर अनेक केस दाखल केल्या आहेत. हे तिचं नेहमीचंच झालं आहे याआधीही तिने असं केलंय. तिच्या मागणीप्रमाणे पैसे मिळाले की ती केस परत घ्यायची.
४. जेव्हा माझी मुलं सुट्टीसाठी भारतात यायची ते त्यांच्या आज्जीसोबतच राहायचे. मग कोणी त्यांना घराबाहेर का काढेल. मी त्यावेळी घरी नव्हतो. इतकेच ती आरोप करतेय तर तिने घराबाहेर काढतानाचा व्हिडिओ का घेतला नाही. एरवी तर छोट्या छोट्या गोष्टींचे व्हिडिओ बनवत असते.
५. तिने नाहक मुलांना या वादात ओढलं आहे. केवळ मला ब्लॅकमेल करण्यासाठी, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी, माझं करिअर बरबाद करण्यासाठी आणि तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ती हे सगळं करत आहे.
शेवटी एकच-जगात कोणत्या पालकांना असं वाटेल की त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबावं, त्यांचं भविष्य खराब व्हावं. उलट त्यांना चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळाव्या म्हणून पालक धडपडतात. मी जे काही आज कमावतोय ते केवळ माझ्या मुलांसाठीच आणि कोणीच ही गोष्ट बदलू शकणार नाहीत. माझं शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे. त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.
प्रेम म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणे नव्हे तर त्याला योग्य मार्गावर उडू देणे आहे. धन्यवाद.'
नवाजुद्दीनने मुलांच्या काळजीपोटी हे पत्र लिहिलं आहे. तर दुसरीकडे त्याचा हा कौटुंबिक वाद कोर्टात आहे. न्यायदेवतेवर विश्वास असल्याचंही त्याने लिहिलं आहे. त्याच्या प्रोफेशनल लाईफविषयी बोलायचं तर नवाज लवकरच 'हड्डी' या सिनेमात झळकणार आहे. यामध्ये त्याने ट्रांसजेंडरची भूमिका साकारली आहे.