जेव्हा नवाझुद्दीन सिद्दीकीने दिली होती कबुली, आयुष्यात आलेल्या मुलींपेक्षा मला त्यांच्या शरीरात अधिक इंटरेस्ट होता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:00 AM2020-05-19T08:00:00+5:302020-05-19T08:00:02+5:30
नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींसोबतच्या अफेअरबद्दल त्याच्या बायोग्राफीत सविस्तर लिहिले होते.
नवाझुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस असून त्याने त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.
नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो अतिशय छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला. पण ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
नवाजने त्याच्या या संघर्षावर ऑन ओरडीनरी लाईफः अ मेमोईर ही बायोग्राफी लिहिली होती. पण ही बायोग्राफी चांगलीच वादात अडकली होती. कारण त्याने यात सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल त्याने सविस्तर लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरीरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती. निहारिकाबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो.माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तिथून निघून यायचे,असे नवाजने यात म्हटले होते. नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफी पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते.
नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. मी गरीब असल्याने सुनीताने मला सोडले, असे नवाजने बायोग्राफीत लिहिले होते. पण सुनीताने नवाजचा हा दावा फेटाळून लावला होता. नवाजची ही बायोग्राफी प्रचंड वादात अडकल्यानंतर त्याने सगळ्यांची माफी मागत ती मागे घेतली होती.