‘मंटो’साठी ‘या’ कलाकारांनी घेतला नाही एकही पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 10:30 PM2018-08-29T22:30:46+5:302018-08-29T22:31:10+5:30
होय, या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक दिग्गजांनी केवळ १ रूपया इतके नाममात्र मानधन घेतले.
प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘मंटो’ हा चित्रपट येत्या २१ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्याआधी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आपण बघितलाच. अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दास हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. साहजिकचं या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक दिग्गजांनी केवळ १ रूपया इतके नाममात्र मानधन घेतले. ‘मंटो’चा लीड अॅक्टर नवाजुद्दीनपासून तर जावेद अख्तरपर्यंत अनेकांनी ‘मंटो’साठी कुठलेही मानधन घेतले नाही. खुद्द नंदिता दास यांनी ही माहिती दिली.
नवाजकडे आम्ही आॅफर घेऊन गेलोत, तेव्हा त्याने लगेच या चित्रपटासाठी होकार दिला. केवळ इतकेच नाही तर त्याने यासाठी मानधन घेणार नसल्याचेही सांगितले. या चित्रपटासाठी त्याने केवळ १ रूपया इतके नाममात्र मानधन घेतले. विशेष म्हणजे, ऋषी कपूर, परेश रावल, रणवीर शौरी, दिव्या दत्त, जावेद अख्तर, पुरब कोहली,राजश्री देशपांडे, स्वानंद किरकिरे, गुरदास मान यांनीही कुठल्याही मानधनाविना या चित्रपटासाठी होकार दिला. हे सगळे माझ्यासाठी खरोखरचं धक्कादायक होते. पण काही कलाकार पैशाचे नाही तर भूमिकांचे, त्यापोटी मिळणाऱ्या समाधानाचे भुकेले असतात, हे मला कळले. अविस्मरणीय भूमिका साकारण्यातला आनंद हेच या कलाकारांचे मानधन असते, असे नंदिता दास म्हणाल्या.
सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिर्द्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले.