'द केरळ स्टोरी' वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला, "समाजात तेढ निर्माण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:35 AM2023-05-25T09:35:09+5:302023-05-25T09:43:27+5:30
दिग्दर्शक अनुराग कश्पने सिनेमाला पाठिंबा दिला असताना नवाजुद्दीनने मात्र टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story). हा सिनेमा समाजात धार्मिक तेढ वाढवत असल्याचा आरोप अनेकांनी केला. काही ठिकाणी सिनेमावर बंदी घालण्यात आली. तरी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून बॉक्सऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. लव्हजिहाद, दहशतवाद अशा संवेदनशील विषयावर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनेही (Nawazuddin Siddiqui) आता 'द केरळ स्टोरी' वादावर मत व्यक्त केलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "कोणताही सिनेमा असो किंवा एखादी कादंबरी जर ते भावना दुखावणारे असेल तर ते चूकच आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावतील या हेतूने सिनेमे बनवले जात नाहीत. सिनेमा हा सामाजिक एकता आणि प्रेमासारख्या भावनेला प्रोत्साहन देणारा असतो. ही आपलीच जबाबदारी आहे. जर एखाद्या सिनेमात लोकांच्या सामाजिक भावना दुखावण्याची क्षमता असेल तर ते चूक आहे. आपल्याला जगाला जोडायचं आहे."
अनुराग कश्यपने सिनेमाला दिलेला पाठिंबा
याउलट काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'द केरळ स्टोरी' सिनेमाला पाठिंबा देणारे ट्वीट केले होते. "तुम्ही सिनेमाशी सहमत असाल किंवा नसाल, हा प्रोपोगंडा असू दे, काऊंटर प्रोपोगंडा असू दे, आक्षेपार्ह असू दे, सिनेमावर बंदी घालणं चूकीचं आहे."
'द केरळ स्टोरी' वर पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यात बंदी घालण्यात आली होती. सिनेमाचे मेकर्स याविरोधात कोर्टात गेले असता कोर्टाने बंदी उठवा असा निर्णय दिला होता. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्येही चित्रपट रिलीज झाला आहे. सुदिप्तो सेन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शहा यांनी निर्मिती केली आहे. अभिनेत्री अदा शर्मा, सोनिया बलानी यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.