नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरातले भांडण रस्त्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:30 AM2023-03-04T09:30:59+5:302023-03-04T09:31:21+5:30
भावाने आईला भेटू दिले नाही, तर मुलांसह घराबाहेर हाकलल्याचा पत्नीचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसमोरील अडचणींमध्ये वाढच होत असून, बुधवारी रात्री त्याच्या घरी झालेल्या गोंधळात त्याच्या भावाने त्याला त्याच्या आईला भेटू दिले नाही. आपल्या घरीच आपल्या आईशी भेट झाली नसल्याने नवाजुद्दीन तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात घराबाहेर उभी असलेली त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केला आहे. पत्नीच्या आरोपानुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सांगण्यावरून मला स्वत:च्या घरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या दोन मुलांसह रस्त्यांवर राहावे लागत आहे.
नुकतेच मालमत्ता आणि पत्नीसोबतच्या वादात अडकलेला नवाजुद्दीन सिद्दीकी देहरादूनहून शूटिंग संपवून वर्सोवा येथील त्याच्या घरी पोहोचला. आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी तो घरात जाऊ लागला. पण त्याचवेळी त्याचा भाऊ फैजुद्दीन आणि त्यांच्या आईची काळजी घेत असलेली केअर टेकर घरातून बाहेर आले. शिवाय नवाजुद्दीनला घरात येण्यास नकार देत आईची तब्येत फारच खराब असल्याचे सांगितले. भावांमध्ये आणि पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडत असून, यामुळे घरात वाद होऊ नये म्हणून त्यांनी घरात येऊ नये, असे नवाजुद्दीन यांना सांगण्यात आले आहे.
काय आहेत
पत्नीचे आरोप ?
हे प्रकरण शांत होत असतानाच काही वेळाने वर्सोव्याच्या या घराबाहेर नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसली. ज्यामध्ये त्यांनी असे आरोप केले की, नवाजने आपल्या कुटुंबातील सदस्यांना, भावांना सांगितले आहे की, मला आणि मुलांना आत घेऊ नका. ज्यामुळे बंगल्यात तैनात असलेले सुरक्षारक्षक त्यांना घरात येऊ देत नाहीत.
परिणामी मुलांसह रस्त्यावर राहावे लागत आहे. तर आपले वडील आपल्यासोबत असे कसे काय वागू शकतात ? असे मुलगी म्हणाली. आलियाने एका खोलीचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, रात्री उशिरा घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या एका नातेवाईकाने तिला एक खोली दिली आहे. ज्यामध्ये ती सध्या तिच्या मुलांसोबत राहात आहे.