"पृथ्वी कॅफेमध्ये काम करायचे, बॉयफ्रेंड सिगरेटसाठी पैसे मागायचा", नीना गुप्ता यांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 10:48 IST2024-10-23T10:48:16+5:302024-10-23T10:48:44+5:30
नीना गुप्ता यांनी आठवला संघर्षाचा काळ

"पृथ्वी कॅफेमध्ये काम करायचे, बॉयफ्रेंड सिगरेटसाठी पैसे मागायचा", नीना गुप्ता यांनी सांगितला किस्सा
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी आपली ओळख सिद्ध केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या इंडस्ट्रीत काम करत आहेत. मात्र करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक धक्के सहन करावे लागले. मुंबईतील पृथ्वी कॅफेमध्ये त्यांनी पार्टटाईम नोकरीही केली होती. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत तेव्हाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्तांनी सुरुवातीचा काळ आठवला. तेव्हा त्या करिअरसाठी दिल्लीवरुन मुंबईत आल्या. काम नसल्याने त्या पृथ्वी कॅफेमध्ये नोकरी करायच्या. तेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड स्वत: बेरोजगार असून वेटरचं काम करते म्हणत त्यांची खिल्ली उडवायचा. त्या म्हणाल्या, "एक दिवस माझा बॉयफ्रेंड आला आणि बहुदा तो नशेत होता. त्याने मला विचारलं की मी दिल्लीहून मुंबईत फक्त वेट्रेस बनण्यासाठी आले आहे का? तो माझ्याकडे सिगरेटसाठीही पैसे मागायचा. मी मेहनत करतेय तरी तो माझी खिल्ली उडवायचा आणि माझ्याचकडे पैसेही मागायचा. मी त्याला पैसे उधार द्यायचे. नशीब मी त्याच्याशी लग्न केलं नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "मी पृथ्वी कॅफेमध्ये भरता आणि आयरिश कॉफी बनवायचे. या बदल्यात मला कॅपेकडून रात्रीचं जेवण मोफत मिळायचं. बराच काळ माझा हा संघर्ष सुरु होता."
नीना गुप्ता यांना नुकताच 'उंचाई' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लवकरच त्या लोकप्रिय वेबसीरिज 'पंचायत' च्या चौथ्या भागाचं शूट सुरु करणार आहेत.